सोनसाखळी चोरीचा सिलसिला सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 07:48 PM2020-02-13T19:48:40+5:302020-02-13T19:49:44+5:30
बुधवारी (दि.१२) रात्री ९ वाजेच्या सुमारास अशोकामार्ग-रविशंकरमार्ग टी-पॉइंटच्या कॉर्नरजवळून खुशबू अल्केश बच्छाव (२७, रा. बालाजी हाईट्स) या पायी जात होत्या.
नाशिक : मागील काही दिवसांपासून सोनसाखळी चोरांनी आपला मोर्चा अशोकामार्ग, रविशंकरमार्ग या भागांकडे वळविला असून, मंगळवार व बुधवार अशा दोन्ही दिवशी सलग दोन महिलांच्या सोनसाखळ्या अशोकामार्गावरून खेचून चोरट्यांनी मुंबई नाका पोलिसांना जणू खुले आव्हानच दिले आहे. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे रहिवाशांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गणेशबाबानगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाइकांची विचारपूस करण्यासाठी राहाता येथून श्वेता व्यंकटेश खिस्ते (२९) या मंगळवारी आल्या होत्या. रात्रीच्या सुमारास रुग्णालयाकडे त्या जात असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला हिसका देऊन १० ग्रॅम सोन्याची साखळी घेऊन चोरट्याने पोबारा केला. या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून सुरू केला जात नाही, तोच पुन्हा बुधवारी (दि.१२) रात्री ९ वाजेच्या सुमारास अशोकामार्ग-रविशंकरमार्ग टी-पॉइंटच्या कॉर्नरजवळून खुशबू अल्केश बच्छाव (२७, रा. बालाजी हाईट्स) या पायी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या साधारणत: ३० वर्षे वयोगटातील दोघा चोरट्यांनी बच्छाव यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढला. सुमारे १५ ग्रॅम वजनाचे ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरी झाल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. २१ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अशोकामार्गावरच आदित्यनगरजवळ स्मिता महेश कुलथे या महिलेची १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून पळ काढला होता. या भागातच वीस दिवसांच्या कालावधीत तीन घटना घडल्यामुळे महिलांमध्ये पोलिसांच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पोलीस चौकी असूनही सर्रास लूट
अशोकामार्ग परिसरात दरमहा सोनसाखळी चोरीची एक तरी घटना घडत असल्याने महिलावर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. अशोकामार्ग चौफुली सिग्नलवर पोलीस चौकी असूनदेखील चोरटे सर्रासपणे या मार्गावर सोनसाखळी चोरी करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांचा धाक या परिसरात चोरट्यांना नसल्याने ही पोलीस चौकी सक्षम करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अनेकदा येथील पोलीस कर्मचारी चौकीच्या बाहेरदेखील पडत नाही. तसेच ज्येष्ठ नागरिक, महिलांनी कायदा सुव्यवस्थेबाबत काही सांगण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना दाददेखील दिली जात नसल्याच्या तक्रारी काही ज्येष्ठ नागरिकांनी केल्या आहेत.