देवळ्यात चोरीच्या घटनांनी घबराट
By admin | Published: May 25, 2017 01:04 AM2017-05-25T01:04:29+5:302017-05-25T01:04:43+5:30
देवळा : शहरासह तालुक्यात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळा : शहरासह तालुक्यात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी होत आहे. सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास देवळा-सटाणा रस्त्यावरील आर.के. प्रोव्हिजन किराणा दुकानाच्या ओट्यावरील गोडेतेलाने भरलेले दोन पिंप अज्ञात चोरट्यांनी स्कॉर्पिओ गाडीत टाकून चोरून नेले. यामुळे संबंधित किराणा दुकानदार मेघनाथ शेवाळकर यांचे अंदाजे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दुकानदाराकडून मिळवले असून, तपास सुरू आहे. शहरात दुचाकी चोरीला जाण्याच्या तसेच घरफोडी व भुरट्या चोरीच्या घटना सातत्याने घडत असून, सर्वस्वी गत वर्षभरापासून शहरातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा कारणीभूत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. देवळा शहरात तीन वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करीत सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली होती. यामुळे पोलीस यंत्रणा सजग असल्याचे व शहरातील रोडरोमिओंना तसेच चोरीच्या घटनांना आळा बसू लागल्याचे चित्र सुरुवातीला दिसू लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु कालांतराने सीसीटीव्ही यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर गुन्हेगारांचे फावले व चोरीच्या घटनात वाढ होऊ लागली. सीसीटीव्ही यंत्रणेची अद्यापपर्यंत दुरुस्ती करण्यात आली नाही. ती का दुरुस्त झाली नाही? याबाबतही नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे.
देवळा पोलीस ठाण्यात नुकतीच पोलीस निरीक्षकपदी गुलाबराव पाटील यांची नेमणूक करण्यात आली असून, शहरासह तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे त्यांच्या पुढे आव्हान आहे. शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तिसगाव येथे मंगळवारी रात्री घरफोडीची घटना घडून ६४ हजार ५०० रु पये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. देवळा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कुलूप तोडून ऐवज लंपास
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिसगाव येथील शेतकरी दयाजी यादव आहेर हे मंगळवारी रात्री आपल्या गावातील घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह झोपण्यासाठी आपल्या शेतावर गेले होते. मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याची बोरमाळ, पोत, मंगळसूत्र, अंगठ्या, कानातील डुल आदि ६४ हजार ५०० रु पये किमतीचा ऐवज चोरून नेला. देवळा पोलिसात याबाबत तक्र ार देण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.