घोटीत सव्वातीन लाखांची चोरी
By admin | Published: February 1, 2017 10:58 PM2017-02-01T22:58:49+5:302017-02-01T22:59:06+5:30
घोटीत सव्वातीन लाखांची चोरी
घोटी : मुंबई-आग्रा महामार्गावर सिन्नर फाट्याजवळ असणारे टायर व बॅटरी विक्रीच्या दुकानाचे गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यानी शटर तोडून दुकानातील महागडे टायर व वाहनाच्या बॅटऱ्या असा तीन लाख ३३ हजार रु पये किमतीचा माल लंपास केला आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घोटी येथे सिन्नर फाट्यावर महामार्गालगत रघुनाथ गौड यांचे साईनाथ अॅटोमोबाइलनामक वाहनाचे टायर आणि बॅटरी विक्रीचे दुकान आहे. रघुनाथ गौड यांच्या आईच्या आजारपणामुळे हे दुकान गेली पाच दिवसांपासून बंद होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानातील २० बॅटऱ्या व बावीस टायर असा तीन लाख ३३ हजार रु पये किमतीचा माल लंपास केला.
आज, बुधवारी सकाळी दुकानात चोरी झाल्याची बाब लगतच्या व्यावसायिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबीची कल्पना रघुनाथ गौड यांना दिली. यानुसार घोटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कमलेश बच्छाव, प्रीतम लोखंडे आदि करीत आहेत. (वार्ताहर)