पोलीस असल्याची बतावणी करीत सोन्याच्या अंगठ्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 01:29 AM2022-02-12T01:29:31+5:302022-02-12T01:30:07+5:30
जयभवानी रोड येथे एका जेष्ठ नागरिकाला पोलीस असल्याची बतावणी करत एका भामट्याने हातचलाखीने ५५ हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.११) घडली. याप्रकरणी प्रकाश मारुतीराव काळे (रा. प्रथमेश बंगला, जयभवानी रोड, आडकेनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नाशिकरोड : जयभवानी रोड येथे एका जेष्ठ नागरिकाला पोलीस असल्याची बतावणी करत एका भामट्याने हातचलाखीने ५५ हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.११) घडली. याप्रकरणी प्रकाश मारुतीराव काळे (रा. प्रथमेश बंगला, जयभवानी रोड, आडकेनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश काळे शुक्रवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास नातीला शाळेत घेण्यासाठी गेले होते. नातीला घेऊन आडकेनगर येथे आले असता दुचाकीवरून आलेल्या एका युवकाने त्यांना ओळखपत्र दाखवत क्राईम ब्रँचचा पोलीस असल्याची बतावणी करीत त्यांच्याजवळील पैसे व सोन्याच्या अंगठ्या रुमालात ठेवून खिशात ठेवण्यास सांगितले. त्यानुसार काळे रुमालात अंगठ्या ठेवत असताना युवकाने काळे यांचा रुमाल घेत अंगठ्या त्यात ठेवून काळेंना रुमाल देत जाण्यास सांगितले. मात्र याच वेळी भामट्या युवकाचा साथीदार त्या ठिकाणी आला. त्याने हातचलाखीने अंगठ्यांसह रुमाल लांबवला. मात्र काळे यांनी पुढे जाऊन रुमाल तपासल्यानंतर १८ ग्रॅमच्या ५५ हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या भामट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले.
मंगळसूत्र चोरून नेले
नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथे दार उघडे असलेल्या घरातून चोरट्याने सोन्याचे मंगळसूत्र व मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. अनुपम सोसायटीत राहणारे महेश पंडित कोष्टी यांनी याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कोष्टी गुरुवारी (दि.१०) सायंकाळी साडेपाच वाजता टागोरनगर येथील दुकानातून दुधाचा माल भरून परिसरातील दुकानांमध्ये माल वाटपास गेले होते. यावेळी त्यांची पत्नी घरात मागील खोलीत काम करीत होती. चोरट्याने या संधीचा फायदा घेत घरात घुसून आत ठेवलेला मोबाइल व बेडरूममधील चार ग्रॅमचे मंगळसूत्र असा सोळा हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.