चापडगाव येथे कांदा रोपांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 11:17 PM2020-10-23T23:17:49+5:302020-10-24T02:49:10+5:30
ऐन हंगामात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यामुळे कांदा रोपांची चणचण भासत आहे. अशातच सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील शेतकरी प्रभाकर निवृत्ती शेळके यांचे उन्हाळ कांद्याचे दोन किलोचे रोपे बुधवारी (दि.२१) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.
नांदूरशिंगोटे : ऐन हंगामात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यामुळे कांदा रोपांची चणचण भासत आहे. अशातच सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील शेतकरी प्रभाकर निवृत्ती शेळके यांचे उन्हाळ कांद्याचे दोन किलोचे रोपे बुधवारी (दि.२१) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.
तालुक्यातील दापूर-चापडगाव रस्त्यालगत असणाऱ्या शेळके यांच्या शेतात किरण गांगड यांनी कांद्याचे रोप वाट्याने केले आहे. रोपे लागवडीयोग्य झाल्याने पाऊस थांबल्यानंतर वाफे तयार करून लागवड करण्यात येणार होती. परंतु त्याच्या आत चोरट्यांनी सुमारे दोन किलोचे रोप लंपास करून हातसफाई केली. वाटेकरी शेतकरी गांगड गुरुवारी (दि. २२) सकाळी शेतात आल्यानंतर त्यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आला. गांगड यांनी तत्काळ कांदा रोपांची चोरी झाल्याची माहिती शेळके यांना दिली. रोपांची बाजारात दहा हजार रुपये किंमत आहे. मजुरी, खत, औषधे तीन हजार रुपये खर्च म्हणजेच एकूण १३ हजारांचे हे रोप होते. ही किंमत काही कमी वाटत असेल तरी सध्या कांद्याच्या बियाणाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने ते महाग झाले आहे. भविष्यात याच रोपापासून शेतकऱ्यांना मोठे आर्थिक उत्पन्न मिळू शकते. दरम्यान, कांदा रोपाचा तुटवडा भासत असल्याने रोपे चोरले असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला.