ठाणगाव येथे चंदनाच्या झाडांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 04:43 PM2018-09-04T16:43:30+5:302018-09-04T16:44:02+5:30
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथून आडवाडी रस्त्यालगत वरखाड मळ्यातून अज्ञात चोरट्यांनी चंदनाची झाडे तोडून नेली. ठाणगाव परिसरात चंदनचोर सक्रिय झाल्याने चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
ठाणगाव-आडवाडी रस्त्यालगत वरखडमळा असून बाळासाहेब बो-हाडे यांच्या शेतातील गट नंबर १९ मधील स्वत:च्या मालकीच्या शेतजमीनीतून आठ-नऊ वर्षापासूनचे चंदनाच्या झाडाची खोदून कटरच्या साहाय्याने चोरट्यांनी झाडांचा खालचा भाग कापून नेला. झाडाचा वरील भाग तसाच ठेवण्यात आला आहे. बो-हाडे यांच्या घरी विवाह सोहळा असल्याने शेतावर रात्रीच्या वेळी परिसरात देखरेख करण्यासाठी कोणीही नसल्याची संधी साधून ही चंदन तस्करी झाल्याचा अंदाज आहे. सोमवारी सकाळी बो-हाडे यांचा मुलगा शेतात गेला असता हा प्रकार उघडकीस आला. अनेक दिवसापासून या भागात चंदनचोर सक्रिय आहे. आतापर्यत या परिसरात चार ते पाच वेळा चंदनचोरीची घटना घडली आहे. मात्र चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याची तक्रार कोणाकडे करायची म्हणून शेतकरी तक्रार करण्यास धजावत नव्हते. चंदनाच्या झाडांची चोरी करणाऱ्या चोरांकडे हत्यार असल्याने झाडात गर आहे किंवा नाही हे मशीनच्या साहाय्याने पाहून मगच ते झाड कापले जात आहे. चंदन चोरीमुळे परिसरातील चंदनाची झाडे नामशेष होत चालली आहेत. वनविभागाच्या वतीने चंदनाच्या झाडांची चोरी करणारी टोळी पकडावी अशी मागणी करण्यात येत आहे.