...तर यापुढे धोका अधिक वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:07 AM2019-03-12T01:07:22+5:302019-03-12T01:07:38+5:30
गिरणारे शिवारातील नाईकवाडी रस्त्यावरील रानवस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद झाली. त्यामुळे नागरिकांनी सध्या सुटकेचा नि:श्वास सोडला आहे;
नाशिक : गिरणारे शिवारातील नाईकवाडी रस्त्यावरील रानवस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद झाली. त्यामुळे नागरिकांनी सध्या सुटकेचा नि:श्वास सोडला आहे; मात्र या भागात या मादीची दोन वर्षांपेक्षा कमी वयाची पिल्लं जर वास्तव्यास असतील तर धोका अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
जेथे बिबट मादी व पिल्लांचा संचार आढळतो, तेथे वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये वनविभागालादेखील पिंजरा लावण्याची परवानगी नाही; कारण अशावेळी पिल्लं जर पिंजऱ्यात सापडली तर मादी अधिक आक्रमक होऊन नागरी वस्तीत शिरकाव करून मोठी हानी पोहचविण्याचा धोका असतो. तसेच मादी जर पिंजºयात सापडली तर पिल्लं कमी वयाची असली तर त्यांची ताटातूट होवून उपासमार संभवते. यामुळे कायद्यान्वये मादी-पिल्लांचा संचार असलेल्या नागरी वस्तीजवळ पिंजरा लावता येत नाही.
गिरणारे शिवारात चार दिवसांपूर्वी एका बिबट्याने शेतकºयावर हल्ला केल्यानंतर ग्रामस्थांकडून पिंजरा लावण्याची मागणी अधिक जोर धरू लागली. त्यानंतर वनविभागाने पिंजरा या भागात तैनात केला. या पिंजºयात साधारणत: पाच वर्षे वयाची बिबट मादी जेरबंद झाली. बिबट-मानव संघर्ष टाळण्यासाठी अभ्यासकांच्या मते शास्त्रीयदृष्ट्या पिंजºयाची उपाययोजना चुकीची आहे. पिंजरा लावल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात समस्या सुटत असली तरी ती समस्या पुढे गंभीर बनते असे वन्यजीव अभ्यासक सांगतात.
जेरबंद झालेल्या मादीला वनविभागाकडून रात्रीच्या अंधारात सुरक्षितठिकाणी नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार आहे. गिरणारे शिवारापासून मादीला जरी खूप दूर अंतरावर मुक्त करण्यात आले तरीदेखील ती आपल्या पिल्लांच्या शोधात पुन्हा गिरणारे भागातील तिच्या मूळ अधिवासात परतण्याची शक्यता नाकारता येणारी नाही. पिल्ले जरी नवजात नसली तरीदेखील किमान दोन वर्षे मादी आपल्या पिल्लांना सोबतच घेऊन वावरत असते, असेही वन्यजीव अभ्यासक सांगतात.
मळे परिसरात पिल्लांची चर्चा
मादी जेरबंद झाली त्यानंतर या भागात पिल्ले असल्याची चर्चा येथील ग्रामस्थांमध्ये सुरू होती. पिल्ले अद्याप कोणाच्याही नजरेस पडलेली नाही; मात्र जर या भागात पिल्ले असतील तर त्यांची भेट आईसोबत आता लवकर होणे अशक्य आहे. या भागातील पिल्लांचे वय अंदाजे दोन वर्षे इतके असले तरी त्यांच्याकडून धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.
नाशिकला विविध नद्यांच्या खोरे तसेच सह्याद्रीची पर्वतरांगदेखील लाभली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात बिबट्यासारखे वन्यजीव आढळतात. वन्यजीव संवर्धन काळाची गरज असून, नागरिकांनी त्यांच्यासोबत सहजीवनाचे तंत्र अवगत करून घेणे आवश्यक आहे. गिरणारेत जेरबंद झालेली बिबट मादी पुन्हा तिच्या मूळ अधिवासात येण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल, जर त्या अधिवासात तिची पिल्लं असतील तर बिबट्याची पिल्ले किमान २६ महिने आपल्या आईसोबत वावरत असतात. त्यानंतर ती स्वावलंबी होत जातात; मात्र आता या भागातील पिल्लांची आईपासून ताटातूट झाली आहे. त्यामुळे पिल्लांची भंबेरी उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. - निकित सुर्वे, अभ्यासक, वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी