...तर आधी करा गोदासेवा
By admin | Published: February 6, 2017 12:24 AM2017-02-06T00:24:53+5:302017-02-06T00:25:07+5:30
संवर्धन चळवळ : सोळा कुंडांसह जलस्त्रोत उघडा; नदी पुनर्प्रवाहित करा
नाशिक : माघ शुद्ध दशमी ही तिथी गोदावरी प्रगट दिन म्हणून मानली जाते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कलावंत व गोदाप्रेमींनी ‘हवा असेल मतांचा मेवा तर आधी करा गोदासेवा’ असा नारा बुलंद केला आहे. गोदावरी बारमाही प्रवाहित राहण्यासाठी उपाययोजना करा आणि गोदावरीचा विकास घडवा, ही चळवळ गोदाप्रेमींनी हाती घेतली आहे. राजकीय तसेच प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे गोदावरीच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आले आहे. यामुळे गोदावरीच्या पात्रात गटारीचे पाणी वाहत असल्याचे विदारक दृश्य नाशिककरांना बघावे लागत आहे. गेल्या वर्षीदेखील गोदावरीचे पात्र संपूर्णपणे कोरडेठाक झाल्याचे भयावह चित्र नाशिककरांनी पाहिले होते. पावसाळ्यानंतर पुन्हा गोदापात्रामधील पाण्याची पातळी अत्यंत कमी झाली आहे. ठिकठिकाणी कचरा साचला असून, गोदा प्रदूषित झाल्याचे चित्र आहे. रामकुंडापासून तर तपोवनापर्यंत फेरफटका मारला असता गोदापात्रातील पाण्याला दुर्गंधी येते. एकूणच गोदावरी शुद्धीकरण व नदीचे नैसर्गिक जलस्त्रोत टिकवावे. कॉँक्रिटीकरणामुळे गोदापात्रातील ऐतिहासिक सोळा कुंड व जिवंत जलस्त्रोत बंद झाले आहेत. महापालिका प्रशासनाने गोदावरीच्या उपनद्या अरुणा व वरुणा (वाघाडी) यादेखील अबाधित ठेवलेल्या नाहीत, असे गोदाप्रेमींचे म्हणणे आहे.