...तर शेतकरी जशास तसे उत्तर देतील: राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 01:43 AM2021-11-27T01:43:48+5:302021-11-27T01:44:19+5:30
महावितरणने सहकार्याचे धोरण राबवून वीजदेयकात सुधारणा करावी. शेतकऱ्यांना वाजवी वीज बिले व त्यात ५० टक्के सूट द्यावी. तरच शेतकरी त्यांचे वीज बिल भरू शकतील. शेतकऱ्यांना जेरीस आणून डी.पी. बंद करण्याचा मार्ग अवलंबला तर शेतकरीही जशास तसे उत्तर देतील, असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.
खेडलेझुंगे : महावितरणने सहकार्याचे धोरण राबवून वीजदेयकात सुधारणा करावी. शेतकऱ्यांना वाजवी वीज बिले व त्यात ५० टक्के सूट द्यावी. तरच शेतकरी त्यांचे वीज बिल भरू शकतील. शेतकऱ्यांना जेरीस आणून डी.पी. बंद करण्याचा मार्ग अवलंबला तर शेतकरीही जशास तसे उत्तर देतील, असा सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.
खेडलेझुंगे येथे शेतकरी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शेट्टी बोलत होते. यावेळी उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस निवृत्ती गारे, जिल्हा अध्यक्ष सुधाकर मोगल, पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळणे, शासनाच्या दर पडण्याच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आर्थिक अवनती, उत्पादन खर्चाच्या आधारावर मका आणि सोयाबीनची हमीभाव मागणी आणि सक्तीची वीज बिल वसुली करून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक या शेतकरी प्रश्नाबाबत यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी सुनीता माळी, माधव महाराज घोटेकर, भाऊसाहेब भवर, शिवनाथ सदाफळ, ऋषिकेश नागरे, आनंद घोटेकर, विजय गिते, दिनकर गिते, ज्ञानेश्वर साबळे, केदारनाथ घोटेकर, संजय बर्डे, प्रमोद गिते, कैलास हागोटे, अशोक घोटेकर, योगेश घोटेकर, प्रतीक घोटेकर यासह रुई, कोळगाव, करंजी, सारोळे, नांदूर मध्यमेश्वर येथील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
इन्फो
लढा उभारण्याची मागणी
यावेळी शेट्टी यांनी खेडलेझुंगे येथील ग्रामदैवत योगिराज तुकाराम बाबा समाधीस पुष्पहार अर्पण करून अभय वरद हनुमानजी यांच्या १११ फूट उंच भव्य मूर्तीचे दर्शन घेऊन उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सरपंच मायाताई सदाफळ यांनी राजू शेट्टी यांचे औक्षण करत त्यांचा सत्कार केला. शेतकऱ्यांच्या वतीने धर्मराज घोटेकर, रामदास गोरडे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभा करण्याची मागणी केली.