...तर मिळेल पोलिसांकडून नववर्षाचे ‘गिफ्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:16 AM2020-12-31T04:16:01+5:302020-12-31T04:16:01+5:30
या वर्षी सर्वच सण उत्सव कोरोनाच्या सावटाखाली पार पडले. लॉकडाऊन शिथिल होऊन अर्थचक्राला गती मिळत असताना, काही प्रमाणात कोरोनाचा ...
या वर्षी सर्वच सण उत्सव कोरोनाच्या सावटाखाली पार पडले. लॉकडाऊन शिथिल होऊन अर्थचक्राला गती मिळत असताना, काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भावही शहरात नियंत्रणात येत आहे. यामुळे कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सार्वजनिकरीत्या नाशिककरांनी थर्टी फर्स्टला एकत्र येणे टाळावे, असे आवाहन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केले आहे. शहरात गुरुवारी रात्री ११ वाजेपासून तर थेट दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. दोन्ही परिमंडळाचे उपायुक्त, सहायक आयुक्त, गुन्हे शाखेचे उपायुक्त, सहायक आयुक्तांसह विशेष शाखा, महिला शाखांचे अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर पहारा देणार आहेत, तसेच सर्व पोलीस ठाण्यांना पोलीस नियंत्रण कक्षाच्या ‘ॲलर्ट’वर ठेवले जाणार असून, पेट्रोलिंग वाहने अधिकाधिक सक्रिय कसे राहतील, या दृष्टीने सूक्ष्मरीत्या नियोजन करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (गुन्हे) संग्रामसिंह निशाणदार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
--इन्फो---
दुकानांचे शटर ११ वाजता होणार डाऊन
शहरातील सर्व प्रकारची दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल यांचे शटर गुरुवारी रात्री ११ वाजता बंद होतील. जे दुकानदार याविरुद्ध कृती करताना आढळतील, त्यांच्यावर थेट गुन्हे संबंधित पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे आदेश सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे.
--इन्फो---
घरगुतीच्या नावाखाली सार्वजनिक हुल्लडबाजी नको
इमारतीचे पार्किंग असो की टॅरेस, कोठेही सार्वजनिकरीत्या कोणीही परिरसरातील नागरिक एकत्र जमणार नाही, असेही निशाणदार यांनी स्पष्ट केले आहे. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने जर अशा प्रकारे कोठे ‘हुल्लडबाजी’ दिसून आली, तर संबंधित सोसायटी किंवा इमारतीच्या अध्यक्ष व सचिवांनाही कारावाईला सामोरे जावे लागू शकते.
--इन्फो--
नशेबाजांवर पोलिसांचा ‘वॉच’
मद्यपी तरुणाईवर पोलिसांचा विशेष ‘वॉच’ राहणार आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत शहरातील कानाकोपऱ्यात पोलिसांकडून प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाईल. या नाकाबंदीत मद्यप्राशन करत किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.