...तर हृदय धडधडले असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:43 AM2018-02-26T01:43:30+5:302018-02-26T01:43:30+5:30

रक्ताभिसरणाचे मुख्य कार्य पार पाडणारे हृदयासारखे महत्त्वाचे अवयव दान करणारा दाता एका गरजूला लाभला आणि गरजूच्या नातेवाइकांनी थेट चेन्नईमधून एअरग्रीन कॉरिडोरसाठी तयारीही दर्शविली; मात्र दिल्लीहून विमानाचे उड्डाण झाले तरी परतीच्या प्रवासासाठी ओझर विमानतळावर रविवारमुळे इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध होण्याबाबत संभ्रम असल्याचे समजल्याने विमानोड्डाण रद्द करण्यात आले; परिणामी दात्याचे हृदय गरजू रुग्णाच्या शरीरात धडधडले नाही.

 ... then the heart is puffed up | ...तर हृदय धडधडले असते

...तर हृदय धडधडले असते

Next

नाशिक : रक्ताभिसरणाचे मुख्य कार्य पार पाडणारे हृदयासारखे महत्त्वाचे अवयव दान करणारा दाता एका गरजूला लाभला आणि गरजूच्या नातेवाइकांनी थेट चेन्नईमधून एअरग्रीन कॉरिडोरसाठी तयारीही दर्शविली; मात्र दिल्लीहून विमानाचे उड्डाण झाले तरी परतीच्या प्रवासासाठी ओझर विमानतळावर रविवारमुळे इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध होण्याबाबत संभ्रम असल्याचे समजल्याने विमानोड्डाण रद्द करण्यात आले; परिणामी दात्याचे हृदय गरजू रुग्णाच्या शरीरात धडधडले नाही. भाजीपाला खरेदीसाठी सायकलवर निघालेले अंबड लिंक रोडवरील नवनाथनगरचे रहिवासी अरुण गणपत तांबोळी-कोठुरकर (५८) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली.  या अपघातात गंभीर जखमी झालेले कोठुरकर यांचा उपचारादरम्यान मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी दोन दिवसांपूर्वी घोषित केले. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. हृदयाचा प्राप्तकर्ता चेन्नई राज्यात असल्याची माहिती मिळाली. तेथून सदर गरजूच्या कुटुंबीयांनी एअरग्रीन कॉरिडोरची तयारी दर्शविली; मात्र रविवार असल्याने नाशिकच्या ओझर विमानतळावरून पुन्हा ‘टेक-आॅफ’करिता इंधनाची निकड पूर्ण होणार नसल्यामुळे विमानाचे उड्डाण होऊ शकले नसल्याची माहिती चेन्नई शहरातील अवयव प्रत्यारोपण समितीचे समन्वयक एल. सतीश यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  वैद्यकशास्त्रानुसार हृदयाचे प्रत्यारोपण तीन तासांत होणे आवश्यक आहे; मात्र दिल्लीहून नाशिकला विमानाला पोहचण्यास किमान अडीच ते तीन तासांचा कालावधी लागणार होता आणि त्यानंतर पुरेशा इंधनअभावी परतीचा प्रवास करणे शक्य नसल्यामुळे संबंधितांनी दिल्लीहून विमानोड्डाण करण्याचा धोका पत्कारला नाही. सुरुवातीला चेन्नई येथून हालचाली सुरू झाल्यानंतर थेट ओझर विमानतळाच्या परवानगीसाठी संपर्क साधला गेला; मात्र परवानगीबाबत प्रथमत: नकार दर्शविला गेल्याची माहिती रेस्क्यू सर्व्हिसेसचे संचालक डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.
यकृत-मूत्रपिंडाने दिले जीवदान
कोठुरकर यांचे एक यकृत व दोन मूत्रपिंडांमुळे दोघांना जीवदान तर नेत्रांमुळे दृष्टीबाधितांना नवी दृष्टी लाभली. दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास पुण्याच्या दिशेने येथून ‘ग्रीन रोड कॉरिडोर’द्वारे यकृत व एक मूत्रपिंड रुग्णवाहिकेतून रवाना करण्यात आले. नाशिक शहर वाहतूक शाखा, ग्रामीण महामार्ग पोलीस, अहमदनगर ग्रामीण पोलीस व पुणे ग्रामीण-शहर पोलिसांनी एकत्रपणे हा कॉरिडोर पूर्ण करत रुग्णवाहिका सुरक्षितपणे पुण्याच्या रुग्णालयापर्यंत अवघ्या तीन तासांत पोहचविली.
कुटुंबीयांच्या मनात खंत
कोठुरकर यांचे यकृत, मूत्रपिंड, डोळे या अवयवांप्रमाणेच हृदयाचे प्रत्यारोपण गरजूच्या शरीरात होऊ शकले असते तर एकप्रकारे आमचे बाबा या जगात अवयवरूपी हयात असते आणि त्यांचे हृदय एका गरजूच्या शरीरात धडधडत असल्याचा आम्हाला दिलासा लाभला असता; मात्र दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही, अशा प्रतिक्रिया त्यांची कन्या वर्षा रकटे अन्य कुटुंबीयांनी व्यक्त केली. यकृत व मूत्रपिंडामुळे जीवदान लाभल्याचे समाधान असल्याचे ते म्हणाले. मात्र शासकीय यंत्रणेने अवयव प्रत्यारोपण चळवळीला अधिक बळ देण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा आणि नाशिकमध्ये विमानतळ संपूर्ण ताकदीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे.

Web Title:  ... then the heart is puffed up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.