...तर चिमुकलीच्या अपहरणकर्त्याचा लागला असता सुगावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:16 AM2021-02-16T04:16:50+5:302021-02-16T04:16:50+5:30
जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसूती कक्षाबाहेरून शनिवारी एक वर्षाच्या चिमुकलीला चोरट्याने पळवून नेले. चिमुकली बाकावर झोपलेली असताना त्याच अवस्थेत त्या ...
जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसूती कक्षाबाहेरून शनिवारी एक वर्षाच्या चिमुकलीला चोरट्याने पळवून नेले. चिमुकली बाकावर झोपलेली असताना त्याच अवस्थेत त्या अनोळखी पुरुषाने त्या बालिकेला उचलून रुग्णालयातून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आजूबाजूच्या लोकांना विचारपूस करत रुग्णालयाबाहेर उभ्या असणाऱ्या काही रिक्षाचालकांकडेही पोलिसांनी चौकशी केली. यावेळी रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मुख्य प्रवेशद्वारामधून एक पुरुष बाळाला खांद्यावर घेऊन एका पायाने लंगडत बाहेर पडला आणि नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या दिशेने गेल्याची जुजबी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर, पोलिसांनी थेट बसस्थानकात धाव घेतली. येथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचा प्रयत्न केला असता कॅमेरे हे मागील काही महिन्यांपासून बंद असल्याचे लक्षात आले. अत्यंत वर्दळीच्या व सार्वजनिक ठिकाणांपैकी एक असलेल्या बसस्थानकातील सीसीटीव्ही यंत्रणा धूळखात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
बसस्थानकांमध्ये सातत्याने नागरिकांची गर्दी असते. यामुळे येथे चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व ते २४ तास कार्यान्वित कसे राहतील, याकडे लक्ष पुरविण्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाची आहे; मात्र याकडे कानाडोळा केला जात असल्याने बसस्थानकावर वावरणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितताही धोक्यात सापडली आहे. पोलिसांनी येथून जुन्या सीबीएसवरील बसस्थानकाकडे धाव घेत तेथेही सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचा प्रयत्न केला असता तेथील सीसीटीव्हींची अवस्थाही यापेक्षा काही वेगळी नव्हती, अशी माहिती दस्तुरखुद्द पोलिसांनी दिली आहे. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक नाहीद शेख हे करीत आहेत.
---इन्फो--
तीन पथके मागावर; पण मागमुस लागेना
चिमुकलीचे अपहरण करणारा पुरुष या बसस्थानकांवर कदाचित आला असेल आणि एखाद्या बसमध्ये बसून शहराबाहेर गेलाही असेल, तरीही पोलिसांना त्याचा कुठलाही मागमुस बसस्थानकामधून लागणे कठीण झाले आहे. कारण, या बसस्थानकांवरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे. कोरोनाकाळात बससेेवा ठप्प होती, तरीदेखील बसस्थानकांमधील भौतिक व मूलभूत सोयीसुविधांकडे लक्ष दिले गेले नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
-----
फोटो आर वर १५पोलीस नावाने सेव्ह आहे.
===Photopath===
150221\15nsk_5_15022021_13.jpg
===Caption===
पोलिसांचे आवाहन