...तर महाराष्ट्र बंदची हाक : कामगारांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 07:01 PM2018-06-06T19:01:35+5:302018-06-06T19:01:35+5:30
मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील काही उद्योजकांकडून कामगारांच्या हिताचा किमान वेतन कायदा पायदळी तुडविला जात आहे.
नाशिक : शहरातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या बेफाम कामगारविरोधी कृ तीच्या निषेधार्थ सी.आय.टी.यू व जिल्हा कामगार कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. कामगारांवर होणारा अन्याय न थांबल्यास तसेच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्यात आलेल्या डॉ. डी. एल. कराड यांची मुक्तता न झाल्यास पुढील जुलै महिन्यात महाराष्ट्र बंदची हाक कामगार देतील, असा इशारा मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला.
मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील काही उद्योजकांकडून कामगारांच्या हिताचा किमान वेतन कायदा पायदळी तुडविला जात आहे. तसेच कामगारांविरोधी धोरण औद्योगिक वसाहतींमध्ये राबविण्याचा प्रतापही केला जात असून, यामुळे नाशिकच्या औद्योगिक वसाहतीमधील कामगारांमध्ये असंतोषाची भावना निर्माण होत असल्याचा आरोप करीत शहरातील बी. डी. भालेकर मैदानापासून बुधवारी (दि. ६) भारतीय ट्रेड युनियन केंद्राच्या (सीआयटीयू) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक एल्गार मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व आडम, संघटनेचे सीताराम ठोंबरे, उपाध्यक्ष श्रीधर देशपांडे, अॅड. वसुधा कराड, सईद अहमद, अॅड. तानाजी जायभावे आदींनी केले.
औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीच्या कामगारांनी संघटनेचे सभासदत्व स्वीकारले असून, संघटनेने समूहाला किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडल्याचे शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. या समूहाच्या अन्य कामगारांनीही सभासदत्व घेण्याची इच्छा व्यक्त केल्याने स्पर्धा निर्माण होऊन हाणामारीची घटना औद्योगिक वसाहतीत घडली. उद्योजक समूहाकडून चिथावणी देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याअंतर्गत पोलिसांना हाताशी धरून संबंधित कारखान्यांच्या मालकाने कामगारांचे राज्याचे नेते डॉ. डी. एल. कराड यांच्यावर जीवे ठार मारण्याच्या कलमाखाली खोटा गुन्हा कामगारांना प्रलोभन दाखवून नोंदविल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला आहे.