...तर ऑक्सिजनअभावी अनेकांच्या प्राणावर बेतले असते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:15 AM2021-03-23T04:15:47+5:302021-03-23T04:15:47+5:30
केारोनामुळे शासकीय आणि खासगी आरोग्य व्यवस्थेतील उणिवा प्रकर्षाने पुढे आल्या. अगदी सुरुवातीला तपासणी झाली तेव्हा संपूर्ण शहरात अवघे ५० ...
केारोनामुळे शासकीय आणि खासगी आरोग्य व्यवस्थेतील उणिवा प्रकर्षाने पुढे आल्या. अगदी सुरुवातीला तपासणी झाली तेव्हा संपूर्ण शहरात अवघे ५० व्हेंटिलेटर्स होते आणि नाशिक महापालिकेकडे त्यापैकी पाचच होते. त्यानंतर त्याची संख्या वाढली; परंतु ऑक्सिजन पुरवठा हा विषय गंभीरच होता. पुण्याजवळून किंवा मुंबई, रायगड, पनवेलकडून गरजेनुसार आणि प्रशासकीय दबावातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत होता. त्यातच सप्टेंबर महिन्यात तेा दिवस आला. सप्टेंबर महिन्यात नाशिकमध्ये उच्चांकी रुग्ण होते. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडसदेखील मिळणे कठीण होते आणि ते मिळालेच तर ऑक्सिजन पुरवठा मुबलक प्रमाणात होत नव्हता. त्याच दिवशी तर संकटच संकट आली. बावीस ते पंचवीस रुग्ण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर होते. त्यातच रात्री एक ते दीड वाजेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक होता. पुण्यावरून टँकर त्याच दिवशी भरून येणे शक्य नव्हते, तर दुसरीकडे स्थानिक पुरवठादार असलेल्या अंबड येथील एका प्लांटमध्ये तर जास्तवेळ प्लँट चालला तसेच अन्य कारणांमुळे ऑक्सिजनच्या प्लँटवर चक्क बर्फ झाला हेाता. तो फोडण्याचे काम कामगार करीत होते. महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव आणि आरेाग्य यंत्रणा, सर्व अभियंते आणि खातेप्रमुख धावपळ करीत होते. शहर अभियंता संजय घुगे आणि अन्य अधिकारी अंबड येथील कारखान्यात पोहोचले; परंतु तेथे ठाण मांडूनही उपयोग हेात नव्हता, पण द्रवरूप ऑक्सिजन तयार होणे जवळपास अशक्य दिसत हेाते.
योगायोगाने नाशिकच्या महापालिका आयुक्तपदाची धुरा सांभाळण्यापूर्वी कैलास जाधव हे राज्य शासनाच्या औद्योगिक विकास महामंडळाचे सहसचिव म्हणून कार्यरत होते. त्यामुळे ऑक्सिजन प्लांटविषयी त्यांना माहिती होती. त्यांनी रायगड येथील कारखान्याला फोन लावला आणि दीड वाजेच्या आत ऑक्सिजन टँकर नाशिकला आला पाहिजे, अशी अट घातली. अन्य अनेक ठिकाणी फोन केले. अखेरीस रायगड येथील एका काराखान्याने पनवेल येथून टँकर पाठवले हे टँकर रात्री दीड वाजेपर्यंत पोहोचले आणि मोठे संकट टळले. आजही प्रशासनातील सर्व अधिकारी याबाबत आठवण जागवत आहेत.
इन्फो...
रुग्णांना ऑक्सिजन पुरवला जात असताना आणखी टँकर केव्हा येईल या विषयी स्पष्टता नव्हती. त्यामुळे आयुक्तांनी विविध ठिकाणी उपाययेाजना करतानाच दुसरीकडे रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची गती काहीशी मंद करण्याच्या सूचना दिल्या. पुरवठादारांकडे साडेबारा ते एक वाजेची डेडलाईन दिली; परंतु प्रत्यक्षात अडीच वाजेपर्यंत ऑक्सिजन पुरवठ्याची अडचण नव्हती. त्यामुळे पूर्वदक्षता कामाला आली. वेळेत ऑक्सिजन पुरवठा झाला आणि अनेकांचे प्राण वाचले.