...तर स्टेअरिंगवर येणार डुलकी

By admin | Published: December 9, 2015 11:37 PM2015-12-09T23:37:21+5:302015-12-09T23:39:43+5:30

नाशिकचा मुक्काम नको रे बाप्पा : ठक्कर बाजार बसस्थानकामधील विश्रांतीगृह बनले समस्यांचे आगार

... then nap to the stairing | ...तर स्टेअरिंगवर येणार डुलकी

...तर स्टेअरिंगवर येणार डुलकी

Next

नाशिक : ‘एक डुलकी एक अपघात’, ‘ नजर हटी दुर्घटना घटी’, ‘मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक’ ‘समय मौल्यवान हैं, जीवन अमूल्य हैं’ वाहतुकीसंदर्भात प्रबोधन करणारे असे विविध घोषवाक्यांचे फलक महामार्गांवर नजरेस पडतात. हे फलक लावण्यामागचा उद्देश एकच की रस्ते अपघात टाळले जावे, वाहतुकीच्या नियमांचे वाहनचालकांनी पालन करावे; मात्र अनेकदा याकडे वाहनचालकांचे दुर्लक्ष होऊन अपघातांना निमंत्रण मिळते. असेच काहीसे दुर्लक्ष परिवहन महामंडळाकडूनही होत असून वाहनचालकांना पुरेशी झोप मिळेल असे विश्रांतीगृहदेखील उपलब्ध करून देण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. वाहनचालकांना पुरेशी झोपही बसस्थानकाच्या विश्रांतीगृहामध्ये घेणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे संध्याकाळी-रात्रीच्या वेळी प्रवाशांची बसेसद्वारे वाहतूक करत असताना स्टेअरिंगवर ‘डुलकी’ लागण्याची चिंता बसचालकांना सध्या सतावत आहे.ठक्कर बाजार नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या विश्रांतीगृहात प्रवेश करताच स्पष्ट होते. रात्रपाळीच्या बसफेऱ्या करणाऱ्या चालक-वाहकांसाठी तयार करण्यात आलेले विश्रांतीगृह हे केवळ नावापुरतेच आहे. यामुळे राज्यभरातून येथे येणाऱ्या चालक-वाहकांच्या उरात नाशिकच्या मुक्कामाने धडकी भरते. ना पिण्याचे पाणी ना वापरायचे पाणी, प्रसाधनगृहाची दुर्दशा, अपुरी जागा, डासांची गुणगुण, दुर्गंधीचे वातावरण अशा एक ना अनेक समस्यांचे ‘ग्रहण’ लागल्याने विश्रांतीगृह हे समस्यांचे आगार बनल्याचे चित्र आहे.
‘एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास’ असा जनसामान्यांना विश्वास आहे. एका चालकाच्या खांद्यावर किमान ५० प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. बसमधील प्रत्येक प्रवाशाला त्याच्या इच्छितस्थळापर्यंत सुरक्षित पोहोचविण्यासाठी कौशल्यपूर्ण वाहतूक करण्यावर बहुतांश चालक भर देतात. महामार्गावर असणाऱ्या ‘एक डुलकी एक अपघात’ या सूचनाफलकानुसार अनेकदा एसटीला अपघात झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत; मात्र याबाबत राज्य परिवहन महामंडळ ‘दक्षता’ घेत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मध्यरात्री बसच्या फेऱ्या असलेल्या चालकाला जर दुपारच्या वेळी पुरेशी झोप मिळत नसेल तर रात्रीच्या सुमारास वाहतूक करताना त्याला डुलकी येणे स्वाभाविक आहे. याबाबत महामंडळाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मध्यवर्ती बसस्थानकात राज्यभरातून बसेस येतात, त्यामुळे त्या बसचालकांसाठी सुसज्ज असे अद्ययावत विश्रांतीगृह असणे गरजेचे आहे. कारण या बसचालकांवरच रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची धुरा आहे. मध्यवर्ती नवीन बसस्थानकातील विश्रांतीगृहाची अस्वच्छता, दुर्गंधीमुळे ‘गोठा’च झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: ... then nap to the stairing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.