...तर लसीकरणाला लागेल ५ वर्षांचा कालावधी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:42 AM2021-02-20T04:42:16+5:302021-02-20T04:42:16+5:30
नाशिक : लस टोचून घेतलेल्या माणसाला जसा लसीचा फायदा होतो, त्याचप्रमाणे लसीमुळे रोगप्रसार मंदावल्याने, लस न घेतलेल्यांनासुद्धा लसीचे अप्रत्यक्ष ...
नाशिक : लस टोचून घेतलेल्या माणसाला जसा लसीचा फायदा होतो, त्याचप्रमाणे लसीमुळे रोगप्रसार मंदावल्याने, लस न घेतलेल्यांनासुद्धा लसीचे अप्रत्यक्ष फायदे मिळतात, तसेच कोरोनाचा प्रभाव ओसरत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने अनेक आरोग्य कर्मचारी फ्रंटलाइन वर्कर्सनी अद्यापही लस घेतलेली नाही. प्रशासनाने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवूनही जिल्ह्यात गत महिनाभरात केवळ ३६,१३६ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे शासकीय लसीकरण केंद्र, खासगी केंद्रांची संख्या वाढवली गेली नाही, तर जिल्ह्याचे लसीकरण पूर्ण होण्यास ५ वर्षांहून अधिक कालावधी लागू शकतो.
लसीबाबतची उदासिनता हे आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनापुढील महत्त्वाचे आव्हान आहे, रोगप्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी लोकांना तयार करणे, हे याहूनही मोठे आव्हान असणार आहे. कोविडवरील लस घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांपर्यंत लस पोहोचवणे, दोन्ही डोस पूर्णपणे घेऊन होणे या सर्व बाबींसाठी प्रदीर्घ कालावधी लागण्याची चिन्हे आहेत. लसीकरणामुळे सामूहिक रोगप्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडते. सध्याच्या घडीला कोविड १९ मध्ये सामूहिक रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी किती प्रमाणात लसीकरण व्हायला हवे, याचे कोणतेही आकडे तज्ज्ञांकडे उपलब्ध नाहीत. लस टोचून घेणाऱ्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढल्यामुळे लस न टोचलेल्या व्यक्तिला त्याचा अप्रत्यक्ष फायदा होतो, यामुळे लसीकरणाचा दर मंदावण्याचीही भीती वाढत आहे, तसेच लसीबाबत अनेक नागरिकांमध्ये अद्यापही गैरसमज, चुकीची माहिती आहे. त्यामुळे निर्माण झालेली भीती, लसीकरणाबाबतची उदासीनता वाढीला लागते. कोणत्याही गैरसमजांना खतपाणी मिळू नये, यासाठी लसीकरणाच्या या टप्प्यापासून ही उदासीनता घालवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
प्रभावी नियोजनाची आवश्यकता
लसीकरणाबाबतची उदासीनता आणि अज्ञान हे रोग प्रतिबंधात्मक उपायांच्या प्रयत्नांना निष्प्रभ करते. लोकांचे निवडीचे स्वातंत्र्य अबाधित राखत त्यांच्या वर्तनात, सवयीत बदल घडवून आणणे याचा वापर करून सामाजिक पुढाकार घेऊन लसीकरणाबाबतची उदासीनता कमी करणे आणि त्याची विश्वासार्हता वाढवणे, असे उपाय करता येऊ शकतात. आरोग्य कर्मचाऱ्यांमधील उदासीनता हा लोकसहभागामधील मोठा अडथळा ठरत आहे. लसीकरणाच्या प्राथमिक टप्प्यात लसीविषयी लोकांच्या मनात विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढीसाठी लस तयार करणाऱ्या कंपन्या, आरोग्य कर्मचारी आणि सामान्य जनता यांच्यात सुसंवाद असणे गरजेचे आहे.
खासगी हॉस्पिटल्सच्या सहभागाची गरज
लसीची उपलब्धता आणि पुरवठा सुरळीत ठेवणे जितके गरजेचे आहे, तितकेच लसीकरण, लसीची उपलब्धता, लसीकरण केंद्रांची सर्वत्र उपलब्धता आणि वितरण यांची पूर्तता आवश्यक आहे. त्या दृष्टीने खासगी हॉस्पिटल्सचा सहभाग या अभियानात करून घेणे आवश्यक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत लसीकरणाची व्यवस्था वेगाने पोहोचवण्यासाठी शासनाला उपलब्ध सर्व पर्यायांची मदत घेणे आवश्यक ठरणार आहे.