...तर चिंतनापेक्षा चिंता महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:18 AM2018-02-27T00:18:29+5:302018-02-27T00:18:29+5:30
आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर आधुनिक काळात आदिवासी संकल्पना प्रथम समजून घेणे काळाची गरज आहे. चिंतनापेक्षा चिंता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आदिवासी साहित्याचे अभ्यासक डॉ. विनायक तुमराम यांनी केले.
सिन्नर : आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर आधुनिक काळात आदिवासी संकल्पना प्रथम समजून घेणे काळाची गरज आहे. चिंतनापेक्षा चिंता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आदिवासी साहित्याचे अभ्यासक डॉ. विनायक तुमराम यांनी केले. येथील सिन्नर महाविद्यालयात आदिवासी चळवळ या विषयावरील चर्चासत्र पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. जगाच्या इतिहासात आदिवासींचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. आदिवासीचा इतिहास, सामाजिक प्रश्न आर्थिक प्रश्न, राजकीय प्रश्न भौगोलिक प्रश्न समजून घेऊनच त्यांना सद्यकालीन समाजप्रवाहाबरोबर आणले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी त्यांच्याविषयी आखलेल्या योजना, खर्च, ध्येयधोरणे आता प्रत्यक्षात अमलात आणणे गरजेचे असल्याचा सूर चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. अलीकडे आदिवासी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. आदिवासींना दळणवळण, आरोग्य, शिक्षण, रोजगार या गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजे, तरच आदिवासी समाज आपल्याबरोबर सन्मानाने जगू शकेल, असे अध्यक्षीय भाषणात मविप्रचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांनी सांगितले.
यावेळी तालुका संचालक हेमंत वाजे याप्रसंगी म्हणाले की, आदिवासी समाजाची झालेली उपेक्षा बदलणे काळाची गरज आहे. त्यांना सर्व प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जे. डी. सोनखासकर यांनी प्रास्ताविक केले. आदिवासींचे प्रश्न त्यांच्यापुरते मर्यादित नसून ते तुमचे आमचे आहेत, असे जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे त्या म्हणाल्या. चर्चासत्रातील दुसºया सत्रामध्ये अध्यक्ष म्हणून प्रा. पी.डी. देवरे होते. यावेळी डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आदिवासींच्या सामाजिक व राजकीय वाटचालीविषयी आपला शोधनिबंध सादर केला. त्यानंतर तिसºया सत्रामध्ये अध्यक्ष डॉ.मुकुंद दीक्षित होते, तर वक्ते म्हणून डॉ. पी.ए. घोष यांनी आपल्या शोधनिबंधातून आदिवासींचे संरक्षणशास्त्र या विषयावर आपले मत व्यक्त केले. प्रा.पांडुरंग भोये यांनी आदिवासींचे राजकारण याविषयी आपल्या शोधनिबंधातून विचार प्रकट केले. यावेळी ११५ विद्यार्थी व शिक्षकांनी चर्चासत्रात सहभाग घेऊन चर्चा केली.