महावितरणच्या धोरणाविरोधात संताप
By admin | Published: August 21, 2016 12:41 AM2016-08-21T00:41:40+5:302016-08-21T00:52:38+5:30
महावितरणच्या धोरणाविरोधात संताप
विंचूर : येथील पांडुरंग नगरमधील रोहित्र गेल्या दोन महिन्यांपूर्वी जळाले असून, दुसऱ्या रोहित्रावरून वीजपुरवठा केला जात आहे. मात्र विजेच्या कमी दाबामुळे येथील घरांमधील विद्युत उपकरणे जळण्याचे प्रकार वाढल्याने महावितरणच्या ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
रोहित्र बसविण्याची मागणी केली असता नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात असून, गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणचे वरिष्ठ अधिकारीही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने येथील ग्राहकांनी ग्राहक न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
महावितरण कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे येथील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पांडुरंग नगरमधील सुमारे शंभरच्यावर रहिवाशांना गत दोन महिन्यांपासून वितरण विभागाकडून शॉक दिला जात आहे. येथील घरांमधील टीव्ही, फ्रीज, विद्युत दिवे यांसह इतर इलेक्ट्रिक उपकरणे जळण्याचे प्रकार वाढले आहेत. रहिवाशांनी वेळोवेळी महावितरणच्या अभियंत्यांकडे तक्रार केली असता चांडवड येथून रोहित्र आणावयाचे असून, त्यासाठी पैशांची तजवीज करण्याचे सांगितले जात असल्याने वीजबिल नियमित भरणाऱ्या ग्राहकांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.
येथील सर्व रहिवासी नोकरदार असल्याने वीजबिल थकण्याचा प्रश्न नसताना नियमित बिले भरणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होत असल्याची भावना रहिवाशांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, येथील नागरिकांनी सांगितले की, रोहित्र बदलण्यासाठी छुप्या मार्गाने पैशांची मागणी करणे गैर असून कर्मचाऱ्यांनी राजरोजपणे पैसे मागावे, त्याची पूर्तता करण्यास येथील रहिवासी तयार आहे. किमान शासनालासुद्धा कळेल की, नियमतिपणे वीजबिल भरणा-या ग्राहकांची कशी पिळवणूक होत असल्याचे जिवंत उदाहरण आहे. येत्या दोन दिवसांत नवीन रोहित्र न बसविल्यास ग्राहक न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे. (वार्ताहर)