शहरात पोलीस गस्तीवर असतात १०८ वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:15 AM2021-01-20T04:15:34+5:302021-01-20T04:15:34+5:30

नाशिक : शहर व परिसराचा दिवसेंदिवस विस्तार होत असून शहरात नव्याने उदयास येणाऱ्या कॉलन्या, नगरांमध्ये पोलीस गस्त पोहचतेच असे ...

There are 108 vehicles on police patrol in the city | शहरात पोलीस गस्तीवर असतात १०८ वाहने

शहरात पोलीस गस्तीवर असतात १०८ वाहने

Next

नाशिक : शहर व परिसराचा दिवसेंदिवस विस्तार होत असून शहरात नव्याने उदयास येणाऱ्या कॉलन्या, नगरांमध्ये पोलीस गस्त पोहचतेच असे नाही. आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण १३ पोलीस ठाणे आहेत. या प्रत्येक पोलीस ठाण्यात एकूण तीन चारचाकी वाहनांद्वारे गस्त घातली जाते. शहरात पोलिसांच्या ४७ चारचाकी आणि बीट मार्शलच्या ६१ दुचाकी गस्तीसाठी रस्त्यांवर असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. आयुक्तालयाला नव्याने पेट्रोलिंगसाठी चार आकर्षक वाहनेही प्राप्त झाली असून लवकरच दोन्ही परिमंडळांमधील चार पोलीस ठाण्यांना प्रत्येकी एक याप्रमाणे दिली जाणार आहेत.

नाशिक शहराचा विस्तार वाढत असताना शहरात पोलिसांवरही त्याचा अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीचे भौगोलिक क्षेत्र हे अत्यंत मोठे आहे. जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत किमान एक तरी झोपडपट्टीचा समावेश आहे. यासोबतच काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शहराजवळच्या खेड्यांमधील मळे परिसरही समाविष्ट आहे. एकूणच पोलिसांची गस्त अन‌् संख्या भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत अपुरी पडत आहे. आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्याला ‘बीट मार्शल’ देण्यात आले आहे. हे बीट मार्शल दुचाकींवरुन पोलीस गस्तीवर असतात. आयुक्तालयात एकूण ६१ बीट मार्शल सध्या सक्रिय आहेत. तसेच प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय एक अशा एकूण १३ पीटर मोबाइल, १३ सीआर मोबाइल, १३ डीबी मोबाइल अशा ३९ चारचाकी गस्तीवर असतात. यासाह विभागनिहाय प्रत्येकी एक अशा ४ निर्भया मोबाइल वाहनेही दिवस-रात्र गस्तीवर असतात. गुन्हे शाखेच्या तीन युनिटची स्वतंत्र वाहने असून त्यांच्याद्वारेही पथक साध्या वेशात गस्तीवर सक्रिय असते.

----इन्फो--

शहरात २४२ घरफोड्या अन‌् २३७ चोऱ्या

नाशिक शहर व परिसरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये गेल्यावर्षी २४२ घरफोड्या झाल्या. तसेच २३७ अन्य प्रकारच्या लहान-मोठ्या चोऱ्यांमध्ये नागरिकांचा ऐवज लुटला गेला. हे प्रमाण २०१९वर्षाच्या तुलनेत कमी राहिले. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि चार ते पाच महिन्यांचे लॉकडाऊन यामुळे यंदा घरफोड्यांच्या प्रमाणात घट झाली; मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून पुन्हा चोरटे सक्रिय झाले आहेत. चोरट्यांनी गेल्या वर्षभरात डिसेंबरअखेरपर्यंत ४१७ वाहने गायब केली आहेत.

---इन्फो--

‘लोकमत’ वॉच- अंतर्गत भागांत अपवादानेच ‘एन्ट्री’

शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहने गस्तीवर जरी असली तरी प्रमुख मार्गांवरुन पोलिसांची वाहने जात असल्याचा अनुभव शहरातील गंगापूर, इंदिरानगर, म्हसरुळ, मुंबईनाका, अंबड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील नागरिकांनी सांगितला. नव्याने उदयास आलेल्या कॉलन्यांमध्ये तसेच अंतर्गत भागात अपवादानेच पोलिसांची वाहने नजरेस पडतात, असे सावरकरनगर, दत्तचौक, गंगासागर कॉलनी, तसेच खुटवडनगर, अंबड, चुंचाळे, पखालरोड, हॅपी होम कॉलनी, रविशंकर मार्गालगतच्या विधातेनगर, कुर्डुकरनगर, आदित्यनगर, खोडेनगर या भागात पोलीस गस्तीची वाहने केवळ मुख्य रस्त्यांवरुन ये-जा करत असल्याचे या भागातील सोसायट्यांच्या सुरक्षारक्षकांनी सांगितले.

---इन्फो--

क्यु-आर कोड अन‌् जीपीएस यंत्रणेची ‘नजर’

पोलीस गस्त चोखपणे व्हावी यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्वच पोलीस ठाण्यांमधील महत्वाच्या भागात क्यु-आर कोड लावण्यात आले आहे. या क्यु-आर कोडचे स्कॅनिंग मोबाईलद्वारे गस्तीवरील पोलिसांना वेळोवेळी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच जीपीएस प्रणालीद्वारेही पोलिसांच्या वाहनांवर ‘कंट्रोल रुम’मधून नियंत्रण ठेवले जाते.

----

सूचना : डमी जेपीजी इमेज आरवर १९पोलीस पेट्रोल व्हेइकल नावाने सेव्ह.

फोटो १९पोलीस/ १९पोलीस१/ १९पोलीस२/ १९पोलीस३/ १९पोलीस४ १९पोलीस४ टीफ नावाने सेव्ह केले आहेत.

Web Title: There are 108 vehicles on police patrol in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.