उद्यानात चक्क १३ जणांचे वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:13 AM2018-06-21T00:13:44+5:302018-06-21T00:13:44+5:30
: महापालिकेच्या उद्यानात असलेल्या वॉचमन आणि माळी क्वॉर्टरमध्ये चक्क खासगी व्यक्ती वास्तव्य करत असल्याचा प्रकार उघड झाला असून, प्रशासनाने यानंतर तीन जणांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
नाशिक : महापालिकेच्या उद्यानात असलेल्या वॉचमन आणि माळी क्वॉर्टरमध्ये चक्क खासगी व्यक्ती वास्तव्य करत असल्याचा प्रकार उघड झाला असून, प्रशासनाने यानंतर तीन जणांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. काही ठिकाणी नगरसेवकांनीच अशाप्रकारे संबंधिताना जागा दिली असल्याची चर्चा असली तरी तेरा पैकी पाच जण हे उद्यान देखभाल दुरुस्तीचे काम करीत होते. विशेष म्हणजे अनेक वर्षे हा प्रकार सुरू असताना महापालिकेला हा सावळा गोंधळ कळला कसा नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहरात महापालिकेची सुमारे साडेचारशे उद्याने असून, त्यातही काही उद्यानांमध्ये वॉचमन किंवा माळी क्वार्टर्स बांधले आहेत. त्यात काही नगरसेवकांनी खासगी व्यक्तींना भाड्याने मिळकती दिल्या असल्याची चर्चा होती. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनीदेखील याबाबत प्रशासनाकडे माहिती मागितली होती. दरम्यान, विद्यमान आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यात महापालिकेची उद्याने, जॉगिंग ट्रॅक आणि व्यायामशाळेत मिळून १३ ठिकाणी खासगी व्यक्ती वास्तव्यास आढळले आहेत. यात शंकरनगर उद्यान, सप्तशृंग देवी मंदिर उद्यान, वृंदावन कॉलनी उद्यान, जाखडीनगर उद्यान, वृक्षवल्ली उद्यान, दादोजी कोंडदेवनगर उद्यान, समर्थ जॉगिंग ट्रॅक, अभंगनगर उद्यान, ओमनगर उद्यान, पुरुष व्यायामशाळा, नाशिकरोड येथील दत्त मंदिररोड जॉगिंग ट्रॅक, एमएसईबी कॉलनी उद्यान येथे खासगी व्यक्ती राहात असल्याचे आढळले होते. त्यापैकी पाच ठिकाणी असलेल्या या व्यक्तींकडून उद्याने आणि ट्रॅक देखभालीचे तसेच झाडांना पाणी देण्याचे काम केले जात आहे, असे महापालिकेच्या सर्वेक्षणातच नमूद करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेने अनेक उद्याने हे खासगीकरणातून देखभाल दुरुस्तीसाठी दिले असून, त्यांचे काही ठिकाणी कामगार आहेत, तर काही ठिकाणी नगरसेवकांनी परस्पर जागा दिल्याचे सांगण्यात येत आहे.