सिन्नर तालुक्यात २१३ मतदान केंदे्र
By admin | Published: February 19, 2017 11:33 PM2017-02-19T23:33:30+5:302017-02-19T23:33:48+5:30
तयारी अंतिम टप्प्यात : वोटर स्लिपचे महसूल यंत्रणेकडून वाटप करण्याचे नियोजन
सिन्नर : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी येत्या मंगळवारी (दि. २१) मतदान होत आहे. त्यासाठी तालुक्यात २१३ मतदान केंद्रे असणार आहेत. मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी विठ्ठल सोनवणे, सहायक निवडणूक अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या सहा तर पंचायत समितीच्या १२ गणांसाठी तालुक्यातील एक लाख ९७ हजार ६२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात एक लाख चार हजार ३२१ पुरुष, तर ९३ हजार २९९ महिला मतदान करतील. जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी १८ तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहे. भाजपा, शिवसेना यांनी संपूर्ण जागेवर स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. तर कॉँग्रेस-राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या तीन जागांवर उमेदवार दिले आहेत. मनसेने एका गटासाठी उमेदवार दिला आहे. काही गटात तिरंगी, तर दोन गटात दुरंगी लढत पहायला मिळत आहे. खरी लढत भाजपा व शिवसेना यांच्यात रंगत असल्याचे चित्र आहे. २१३ मतदान केंद्रांसाठी ४२६ मतदानयंत्रे असणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी स्वतंत्र मतदानयंत्रे असणार आहेत, तर २४ मतदानयंत्रे राखीव असणार आहेत. मंगळवारी (दि. २१) होणाऱ्या मतदानासाठी १२६४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, १३२ कर्मचारी राखीव म्हणून आहेत. एकूण १३९६ कर्मचारी निवडणूक कामासाठी सज्ज झाले आहेत. प्रत्येक १२ गणांसाठी स्वतंत्र क्षेत्रिय अधिकारी असणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक शिपाई असे पाच कर्मचारी असणार आहेत, तर कमी मतदान असणाऱ्या १४ केंद्रांवर प्रत्येकी तीन कर्मचारी असणार आहेत. मतदान करण्याची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी स्वतंत्र मतदानयंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांना दोन स्वतंत्र यंत्रांवर प्रत्येकी एक मत द्यावे लागणार आहे. प्रत्येक मतदानयंत्रात शेवटचे बटण ‘नोटा’चे असणार आहे. (वार्ताहर)