मालेगावी प्रत्येक कुटुंबांच्या सर्वेक्षणासाठी ४०० पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 11:50 PM2020-04-09T23:50:23+5:302020-04-09T23:50:52+5:30
कोरोनाने मालेगाव शहरात प्रवेश केला असून, पाच बाधित रुग्ण आढळून येणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे ४०० पथके तयार करून तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले.
नाशिक/मालेगाव : कोरोनाने मालेगाव शहरात प्रवेश केला असून, पाच बाधित रुग्ण आढळून येणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे ४०० पथके तयार करून तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले.
मालेगावी झालेल्या विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री दादा भुसे उपस्थित होते. जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, वैद्यकीय तज्ज्ञ, शिक्षक व शासकीय कर्मचारी यांचा समावेश असलेली ४०० जणांची टिम नागरिकांचे सर्वेक्षणाचे काम करणार आहे. ज्यांना लक्षणे दिसून येतील त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात येईल. ‘कोरोना’ दारात येऊन ठेपला आहे, येणारे आठ दिवस अतिमहत्त्वाचे आहेत. मालेगावमधील प्रकार प्रथमदर्शनी सामूहिक संसर्गाचा दिसून येत आहे. प्रशासनाच्या उपाययोजना कडक राबविण्यात येणार आहेत. पाचही बाधित रुग्णांचा निवासी परिसर सिलबंद करण्यात आला आहे. या रुग्णांना कुठलीही प्रवासी पार्श्वभूमी दिसून येत नसल्यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. यासाठी कोम्बिंग आॅपरेशनही राबविण्यात येणार आहे. पाच पैकी एकाचा मृत्यू झाला असून, खासगी रुग्णालय पूर्णपणे क्वारंटाइन हॉस्पिटल म्हणून अधिग्रहित करण्यात आले आहे. याठिकाणी चारही रुग्णांना उपचारासाठी स्थलांतरित करण्यात येणार आहे. संचारबंदीची मुदत वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कंट्रोल रुमची तत्काळ स्थापना करावी, स्वस्त धान्य वितरणाचे नियोजन करावे, भाजीपाला वितरणासाठी मोजक्या हातगाड्यांना परवाने देऊन घरपोच भाजीपाला पोहोचवावा, स्वयंसेवी संस्थांची मदत एका छताखाली आणून प्रशासनामार्फत गरजूपर्यंत पोहोचविण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या.
यानंतर मंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी मांढरे यांच्यासह डॉक्टर व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रुग्णालयास भेट देत डॉक्टर व नर्सिंग स्टाफचे मनोबल वाढवले.
... तर फौजदारी कारवाई
राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले, रेशन, भाजीपाला, आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना तयार करत असून, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. धान्य वितरण व्यवस्थेमध्ये साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले.