संचारबंदी आहे; मात्र केवळ कागदावरच..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:13 AM2021-04-16T04:13:58+5:302021-04-16T04:13:58+5:30
राज्य सरकारच्या वतीने संचारबंदी आदेश दिवस-रात्र लागू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तालयाकडूनही या आदेशानुसार स्पष्टपणे स्थानिक ...
राज्य सरकारच्या वतीने संचारबंदी आदेश दिवस-रात्र लागू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तालयाकडूनही या आदेशानुसार स्पष्टपणे स्थानिक पातळीवर कलम-१४४ आदेशाची अधिसूचना काढण्यात आली. या आदेशामध्ये केवळ अतिअत्यावश्यक वैद्यकीय कारणांचा अपवाद वगळता अन्य कुठल्याही कारणांनी नागरिकांना घराबाहेर पडता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार विविध अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व त्यासंबंधित कर्मचारी वर्ग वगळता अन्य कोणीही रस्त्यांवर येऊ नये, असे म्हटले आहे. मात्र, शहरात याउलटच चित्र गुरुवारी दिवसभर पहावयास मिळाले.
बुधवारी रात्रीपासून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘फिक्स पॉइंट’ लावून नाकाबंदी केली जात होती, ते नाकेही गुरुवारी दिवसभर ओस पडल्याचे चित्र होते. बहुतांश नाक्यांवर तर बॅरिकेडदेखील अस्ताव्यस्त झाल्याचे पहावयास मिळाले. काही नाक्यांवरून पोलीस कर्मचारीही गायब झालेले हाेते तर ज्या ठिकाणी कर्मचारी होते, ते एका बाजूला बसून मोबाईलवर मग्न असल्याचे दिसून आले. शहर व परिसरात पोलीस गस्त गुरुवारी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत काहीशी ‘चोख’ पहावयास मिळाली, मात्र त्यानंतर गस्त अन् नाकाबंदीही ढेपाळल्याची स्थिती होती.
---इन्फो--
सिग्नलवर वाहनांची गर्दी
शहरात सर्वत्र नागरिकांची रेलचेल कायम असल्यामुळे संचारबंदी असतानाही शहरातील सिग्नलवर वाहनांची गर्दी दिसून आली. यामुळे संचारबंदी कायद्याचे पालन काटेकोरपणे नागरिकांकडून करण्यात येत नसल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. बहुतांश लोक रस्त्यावर वावरत असल्यामुळे संचारबंदी आहे तरी कोठे? असाच प्रश्न अनेकांना पडला.
---इन्फो--
बाहेर पडलेल्यांची कारणे अशी...
भाजीपाला,फळे घेण्यासाठी चाललो.
किराणा माल आणायला जात आहे.
औषधी घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेलो होतो.
दवाखान्यात तपासणीसाठी चाललो.