जिल्ह्यात सध्यातरी लॉकडाऊन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:42 AM2021-02-20T04:42:07+5:302021-02-20T04:42:07+5:30
नाशिक: जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या वाढत असली तरी सध्यातरी नाशिकमध्ये लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता नाही. परंतु नागरिकांनी ...
नाशिक: जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या वाढत असली तरी सध्यातरी नाशिकमध्ये लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता नाही. परंतु नागरिकांनी खबरदारी घेतली नाही तर लॉकडाऊनचा पुन्हा विचार करावा लागेल असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरेानाचा संसर्ग वाढत असल्याने दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने काळजी घेतली गेली पाहिजे असेही भुजबळ म्हणाले.
शिवजयंती उत्सवानिमित्ताने नाशिक दौऱ्यावर असलेले पालकमंत्री छगन भुजबळ यांना जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीविषयी विचारले असता त्यांनी तूर्तास नाशिकला लॉकडाऊन लागू केला जाणार नसल्याचे सांगितले. यावेळी भुजबळ यांनी सांगितले की, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झालेली असल्याने काही ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्याची वेळ आलेली आहे. नाशिक जिल्ह्यासंदर्भात अद्याप लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला नाही. वास्तविक लॉकडाऊन करणे नागरिक आणि शासनाला देखील परवडणारे नाही. दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू राहणे गरजेचे आहे. रूग्णसंख्येमध्ये वाढ होत गेल्यास मात्र लॉकडाऊन लागू करण्याबाबतचा विचार करावा लागेल असेही भुजबळ म्हणाले.
अनलॉक लागू करतांना शाससाने सुरक्षितता बाबतच्या काही अटी घालून दिलेल्या आहेत. त्याचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. मास्क वापरला पाहिजे, सुरक्षित अंतर तसेच सॅनिटायझरचा वापर नियमित केला पाहिजे. हे सर्व आपल्याच हातात आहे. त्यामुळे लॉडाऊनचा निर्णय देखील नाशिककरांच्याच हातात आहे. त्यांनीच अधिक खबरदारी घेतली पाहिजे. नाशिक जिल्ह्यात सध्यातरी लॉकडाऊन लागू करण्याबाबतच विचार करण्यात आलेला नाही. मात्र रूग्ण संख्येत वाढ होत राहिल्यास नाईलाजाने जिल्ह्याबाबत पुनर्विचार करावा लागेल असेही भुजबळ म्हणाले.