चार दिवसांपासून जिल्ह्यासाठी लसीचा पुरवठाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:14 AM2021-05-23T04:14:27+5:302021-05-23T04:14:27+5:30
नाशिक : कोरोना प्रतिबंधात्मक कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसींचा गेल्या चार दिवसांपासून एकही डोस नाशिक जिल्ह्याला प्राप्त झालेला ...
नाशिक : कोरोना प्रतिबंधात्मक कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसींचा गेल्या चार दिवसांपासून एकही डोस नाशिक जिल्ह्याला प्राप्त झालेला नसल्याने नाशिक शहरासह ग्रामीण भागातील केंद्र बंद करण्याची परिस्थिती उद्भवली असून, सोमवारी सकाळी डोस उपलब्ध झाले तर लसीकरण करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी दर आठवड्याला दोन लाख डोस उपलब्ध करून द्यावेत, यासाठी आरोग्य विभागाकडून पाठपुरावा केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून लस घेणाऱ्यांची होणारी गर्दी व लसींचा अपुरा पुरवठा यामध्ये तफावत निर्माण होऊन केंद्रांवर गोंधळ होण्याचे प्रकार घडले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असताना डॉक्टर व परिचारिकांनी संयमाने परिस्थिती हाताळली आहे. मात्र, शासनाकडूनच पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने असा प्रकार वारंवार घडू लागला आहे. शासनाकडून ऐनवेळी लसींचा पुरवठा केला जातो, त्यातही किती लसी मिळतील, याबाबत अनिश्चितता असल्यामुळे त्याचे नियोजन करतानाही आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यासाठी लसींचा पुरवठाच झालेला नसून, ज्या-ज्या केंद्रावर लस शिल्लक आहे, त्यांच्यामार्फत चार दिवसांपासून लसीकरण केले जात आहे तर लस शिल्लक नसल्याने अनेक केंद्र बंद करण्यात आली आहेत.
नाशिक शहरात गेल्या तीन दिवसांपासून लसीकरणाची गती मंद झाली आहे. दोन किंवा तीन केंद्रांवरच लसीकरण सुरू असल्यामुळे अन्य केंद्रांवर दररोज ज्येष्ठ नागरिक हजेरी लावून पुन्हा रिकाम्या हाताने परतत आहेत. शनिवारी पंचवटीतील फक्त इंदिरा गांधी रूग्णालयात लसीकरण करण्यात आले तर सिडकोतील चारही केंद्रांवर गेल्या चार दिवसांपासून लस नसल्याने टाळे ठोकण्यात आले आहे. नाशिकरोडलाही खोले मळ्यातच लसीकरण केले जात असल्याने अन्य ठिकाणी नागरिक प्रतीक्षेत आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्यासाठी शनिवारी पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक होता. रविवारी लस उपलब्ध झाल्यास सोमवारी पुन्हा केंद्र सुरू केली जातील अन्यथा सोमवारीही जिल्ह्यात लसीकरण होणार नसल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.