हिंगणवेढ्यात बिबट्याचा वावर कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 06:23 PM2019-01-03T18:23:29+5:302019-01-03T18:24:06+5:30
लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : येथुन जवळच असलेल्या हिंगणवेढा-एकलहरे शिव रस्त्यावरील मळे विभागात गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा वावर कायम असून, ...
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : येथुन जवळच असलेल्या हिंगणवेढा-एकलहरे शिव रस्त्यावरील मळे विभागात गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा वावर कायम असून, त्यामुळे नागरिक भयभयीत झाले असून, वन विभागाने अद्यापही या भागात पिंजरा लावलेला नाही, त्यातच द्राक्षबागेत बिबट्याच्या पंजाचे ठसे आढळले आहेत.
गेल्या आठवड्यात बिबट्याने साहेबराव धात्रक यांच्या कुत्र्यावर रात्री ९ वाजेच्या दरम्यान हल्ला करुन ओढुन नेले होते. मात्र कुत्र्याच्या गळ्यातील अणकुचीदार पट्ट्याने व नागरीकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने कुत्र्याला सोडुन पलायन केले. यातुन कुत्रा वाचला असला तरी त्याच्या अंगावर ठिकठिकाणी भरपुर जखमा झाल्या. हिंगणवेढे शिवारातील अनेक नागरीकांच्या गाई, वासरे, कुत्रे फस्त केल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच वन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संबंधित शेतक-यांची चौकशी केली व पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमार्फत वन विभागाकडे पिंजरा लावण्यासाठी रितसर अर्जही दिला आहे. मात्र अजुनही या भागात पिंजरा लावण्यात आला नाही. त्यामुळे बिबट्याचा मुक्त संचार अजुनही सुरुच आहे. या बिबट्याने आपला मोर्चा आता एकलहरे हद्दीतील मुंजाबामळा परिसराकडे वळविला आहे. मुंजाबा मळा परिसरात १० ते १५ शेतक-यांची घरे आहेत. आजुबाजुला शेतात उस असल्यामुळे बिबट्याला लपायला जागा आहे. चार दिवसांपुर्वी रात्रीच्या वेळी बिबट्याने रामदास रेवजी डुकरेपाटील यांच्या घराजवळील शेतातील पाळीव कुत्र्यावर हल्ला करुन त्याला द्राक्ष बागेतुन लांबवर फरफटत नेले व फस्त केले. दुस-या दिवशी पाटील यांनी एकलहरे ग्रामपंचायतीला कळविले. ग्रामपंचायतीने वन विभागाला पत्र पाठवुन येथील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. बिबट्याच्या वावरामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.