जिल्ह्यात एकही नाही ‘भाग्यश्री’ कन्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:04 AM2018-02-27T01:04:13+5:302018-02-27T01:04:13+5:30
एक किंवा दोन मुलींवर कुटुंबनियोजन केलेल्या दाम्पत्यांसाठी शासनाने सुरू करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेमध्ये जिल्ह्यात एकही लाभार्थी नसल्याची बाब समोर आली आहे. मुलींच्या जन्मानंतरही मुलाची अपेक्षा कायम आहे की सदर योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचलीच नाही? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
नाशिक : एक किंवा दोन मुलींवर कुटुंबनियोजन केलेल्या दाम्पत्यांसाठी शासनाने सुरू करण्यात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेमध्ये जिल्ह्यात एकही लाभार्थी नसल्याची बाब समोर आली आहे. मुलींच्या जन्मानंतरही मुलाची अपेक्षा कायम आहे की सदर योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचलीच नाही? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. महाराष्टÑ शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या माध्यमातून मुलींच्या सन्मानासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. गेल्या आॅगस्टपासून या योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातून एकाही लाभार्थ्याने अर्ज केलेला नाही. यामुळे मुलींच्या जन्मानंतरही वंशाचा दिवा म्हणून मुलांची वाट पाहिली जात असल्याचे यामुळे स्पष्ट होते. अर्थात हे ठामपणे सांगता येत नसले तरी या योजनेविषयी असलेल्या उदासीनतेमुळे योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतिबंध करणे या हेतूने शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू केली आहे. शासनाने या योजनेची व्याप्ती अधिक वाढविली असून, आता या योजनेत ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ७.५ लाख रुपये आहे, अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येतो. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाºयांना मुलीच्या नावे ५० हजार रुपये बॅँकेत जमा केले जातात.
ज्या माता-पित्यांनी दुसºया मुलीच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन केले असेल त्या दोन्ही मुलींच्या नावे २५-२५ हजार रुपये जमा केले जातात. यामध्ये या मुलींना वयाच्या सहा आणि बाराव्या वर्षी या रकमेचा लाभ घेता येऊ शकतो. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला व्याजासह पूर्ण रक्कम दिली जाते. परंतु त्यासाठी मुलगी दहावीपर्यंत शिकलेली असली पाहिजे. वास्तविक सदर योजना ही एप्रिल २०१६ पासून लागू आहे. मात्र त्यावेळी या योजनेत केवळ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनाच लाभ दिला जात होता. परंतु या योजनेची व्याप्ती आता वाढविण्यात आली असून, उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात आलेली आहे. सदर योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असली तरी या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. योजना लागू झाली तेव्हा नाशिक जिह्यातून तब्बल २१ पालकांनी याचा लाभ घेतला होता. परंतु आता दीड वर्षात या योजनेसाठी कुणीही अर्ज केलेला नाही.
मानसिकता बदलण्याची गरज
पालकांची मानसिकता अजूनही बदलेली नाही हेदेखील यातून अधोरेखित झाले आहे. काहींनी पहिल्या मुलीच्या जन्मानंतर पुन्हा दुसºया अपत्याची वाट पाहिली आणि दुसरीही मुलगीच झाल्यानंतर काहींनी कुटुुंबनियोजन करीत योजनेचा लाभ घेतला, तर काहींना मुलगा झाल्यामुळे त्यांनी या योजनेचा विचारच केला नाही, असा निष्कर्ष आता महिला बालकल्याण विभागाने काढला आहे.