मिनी मंत्रालयासाठी विकास आघाडी नको
By admin | Published: January 26, 2017 12:52 AM2017-01-26T00:52:04+5:302017-01-26T00:52:17+5:30
भाजपाचा नेत्यांना सूचक इशारा
नाशिक : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपातीलच काही नेत्यांनी जिल्ह्णात जिल्हा विकास आघाडीची मोट बांधण्यास सुरुवात केलेली असतानाच बुधवारी (दि. २५) भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी मात्र भाजपा व्यतिरिक्त जिल्हा परिषदेसाठी कोणत्याही विकास आघाडीस मान्यता दिली जाणार नाही, असा सूचक इशारा दिला. काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या वतीने वसंत स्मृती पक्ष कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी प्रसार माध्यमांशी अनौपचारिक गप्पा मारताना काही तालुक्यांत पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांनी पक्ष चिन्हाऐवजी जिल्हा विकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढल्यास या निवडणुका काही गटांपुरत्या का होईना, बिनविरोध होण्याची शक्यता असल्याने तशी परवानगी मागितल्याचे सांगितले होते. जिल्ह्णातील कसमादे पट्ट्यातील भाजपाची काही मंडळी जिल्हा विकास आघाडीची मोट बांधण्याच्या वृत्ताला त्यामुळे बळकटी मिळाली होती; मात्र यासंदर्भात बुधवारी झालेल्या प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांच्या पत्रकार परिषदेत या विषयावर पडदा पडला. भाजपा चिन्हा व्यतिरिक्त कोणत्याही चिन्हावर अथवा आघाडीला भाजपाचा पाठिंबा राहणार नाही. जिल्हा विकास आघाडीचे जरी उमेदवार उभे राहिले तरी तेथे भाजपाचे अधिकृत उमेदवार उभे करण्यात येतील. प्रदेश पातळीवरून कोणत्याही विकास आघाडीला मान्यता देण्यात आलेली नसल्याचेही प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले. त्यामुळे कसमादे परिसरातील भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्या मात्र जिल्हा विकास आघाडी करून अपक्ष उमेदवारी करण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाच्या नेत्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. (प्रतिनिधी)