नाशिक मर्चंट बॅँकेची बिनविरोध निवडीसाठी चर्चाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:27 AM2018-11-16T00:27:25+5:302018-11-16T00:36:47+5:30
नाशिक मर्चंट बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बागमार समर्थक माजी संचालकांच्या प्रगती पॅनलकडून कोणत्याही प्रकारे प्रस्ताव सादर नाही, असे असताना मतदारांची सहनुभूती मिळवण्यासाठी अशाप्रकारच्या चर्चा पसरविल्या जात असल्याचा दावा सहकार पॅनलचे नेते गजानन शेलार यांनी केला आहे. प्रतिस्पर्ध्यांविषयी आमचा कोणताही दुराग्रह नाही, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण लढत करण्यासाठी सज्ज असून २३ नोव्हेंबर रोजी उमेदवार घोषित केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
नाशिक : नाशिक मर्चंट बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बागमार समर्थक माजी संचालकांच्या प्रगती पॅनलकडून कोणत्याही प्रकारे प्रस्ताव सादर नाही, असे असताना मतदारांची सहनुभूती मिळवण्यासाठी अशाप्रकारच्या चर्चा पसरविल्या जात असल्याचा दावा सहकार पॅनलचे नेते गजानन शेलार यांनी केला आहे. प्रतिस्पर्ध्यांविषयी आमचा कोणताही दुराग्रह नाही, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण लढत करण्यासाठी सज्ज असून २३ नोव्हेंबर रोजी उमेदवार घोषित केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
नाशिक मर्चंट बॅँक निवडणुकीच्या घोषणेनंतर आता ज्वर वाढला आहे. या बॅँकेतील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या बागमार समर्थक माजी संचालकांनी प्रगती पॅनल केले असून ललित मोदी, गजानन शेलार, भास्करराव कोठावदे, अजय ब्रह्मेचा यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलदेखील निवडणुकीसाठी सज्ज आहे. बॅँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेक प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणून बॅँकिंग फेडरेशनने मंगळवारी (दि.१३) गोविंदनगर येथेही बैठक बोलावली होती. या बैठकीत सहकार पॅनलने दहा जागा मागितल्या. प्रगतीमध्ये १० माजी संचालक असल्याने ही मागणी पूर्ण करता येत नसल्याचे प्रगती पॅनलचे नेत्यांनी जाहीर केले होते. त्यास सहकारचे नेते गजानन शेलार यांनी हरकत घेतली आहे.
बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न झाले असल्याचे सांगितले जात असले तरी सहकारकडे असा कोणीही प्रस्ताव मांडलेला नव्हता, त्यामुळे कोणत्याही प्रकारे या जागा सोडण्याची केलेली मागणी निखालस खोटी आहे. मतदारांची सहानुभूती मिळण्यासाठी अशाप्रकारे प्रयत्न सुरू असून, त्याची पुनरावृत्ती झाल्यास मग मात्र जशास तसे उत्तर देण्यात येईल, असे शेलार यांनी सांगितले. सहकार पॅनलचा कोणाविषयी पूर्वग्रह दूषित नाही. ज्यांच्याकडे १९ संचालक आहेत असे म्हणणे आहे त्यांची तयारी असल्याने कोणाचीही संधी हुकविण्याची आमची तयारी नाही. आमचे पॅनल तयार असून, येत्या २३ तारखेला सर्व उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, असे ते म्हणाले.
नम्रता पॅनलची पहिली यादी घोषित
नाशिक : नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीतील अजित हुकूमचंद बागमार प्रणीत नम्रता पॅनलच्या उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी (दि.१५) घोषित करण्यात आली आहे. अनेक प्रकारचे दबाव येत असल्याने उर्वरित यादी आता २५ नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात येईल, अशी माहिती बागमार यांनी दिली.
हुकूमचंद बागमार यांचे सुपुत्र असलेल्या अजित बागमार यांनी वडिलांच्या नम्रता पॅनलखालीच निवडणूक लढविण्याची तयारी केली. त्यानुसार त्यांनी काही जागांवरील उमेदवार घोषित केले आहेत.
त्यानुसार सर्वसाधारण गटातून अजित हुकूमचंद बागमार, प्रवीण तिदमे, अनंता सूर्यवंशी, भास्कर निकम, दिलीप पवार (त्र्यंबक/ घोटी), धरमचंद पगारिया (सुरगाणा/ पेठ), अनिल भोर (निफाड), विनोद ललवाणी (श्रीरामपूर) असे सर्व भागांना प्रतिनिधित्व देणारे उमेदवार दिल्याचे बागमार यांनी सांगितले तर अनुसूचित जाती जमाती गटातून महेश पठाडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सदरच्या चुरशीच्या निवडणुकीत मतदानात विभागणी होऊ नये यासाठी माघारीसाठी अनेक उमेदवारांवर दबाव येत असून त्यामुळे गुरुवारी (दि.१५) केवळ आठ नावे घोषित करण्यात आली. उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्व उमेदवारांची नावे घोषित करण्यात येईल, असे बागमार यांनी सांगितले.