जुन्या-नव्यांचा वाद नको
By admin | Published: March 7, 2017 02:01 AM2017-03-07T02:01:02+5:302017-03-07T02:01:17+5:30
नाशिकरोड : जुन्या-नव्यांचा वाद न करता सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी केले
नाशिकरोड : मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर भाजपाला स्वबळावर नाशिककरांनी एकहाती सत्ता दिली. त्यामुळे नगरसेवकांची जबाबदारी वाढली असून, जुन्या-नव्यांचा वाद न करता सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी केले. यावेळी मनपामध्ये भाजपा गटनेतेपदी नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांची एकमताने निवड करण्यात आली.
मनपातील भाजपा नगरसेवक गटनोंदणीच्या निमित्ताने उत्सव मंगल कार्यालयात सोमवारी दुपारी भाजपा नाशिकरोड मंडलाच्या वतीने नूतन नगरसेवकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना सानप म्हणाले की, नाशिककरांनी बहुमताने भाजपाला सत्ता दिल्याने आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. वर्षभरापासून सर्व पदाधिकारी मनपामध्ये सत्ता आणण्यासाठी परिश्रम घेत होते.
ज्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट व परिश्रम घेतले त्यांना नक्कीच मनपा व शासनाच्या विविध समित्यांवर घेऊन त्यांचा सन्मान केला जाईल. मनपामध्ये ६६ नगरसेवक निवडून आले असून, ९० पदे मिळणार आहेत. त्यामुळे कोणीही वादविवाद करू नये. तसेच जुने-नवीन वाद करू नका. जो पार्टी वाढविण्यासाठी काम करत आहे त्यांचा मान वरिष्ठ पदाधिकारी ठेवतील, असेही सानप यांनी सांगितले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, लक्ष्मण सावजी, विजय साने, प्रकाश घुगे आदिंची भाषणे झालीत. भाजपा नाशिकरोड मंडळाच्या वतीने सर्व नगरसेवकांचा भगवा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कार्यकर्ते लालचंद तापडिया, नाशिकरोड मंडल अध्यक्ष बाजीराव भागवत, योगेश भगत, युनूस सय्यद, शांताराम घंटे, हेमंत गायकवाड, संजय शिरसाठ, सतीश रत्नपारखी, सचिन हांडगे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सर्व नगरसेवकांना पारदर्शक कारभाराची शपथ दिली.
भाजपा गट नोंदणी
विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपा नगरसेवकांची आयुक्त एकनाथ डवले यांच्यासमोर गट नोंदणी करण्यात आली. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)