अग्निसुरक्षा नसल्याने ५० क्लासेसवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:29 PM2020-02-17T23:29:36+5:302020-02-18T00:17:10+5:30
अग्निसुरक्षा साधने नसल्याने शहरातील सुमारे पन्नास खासगी क्लासेसवर कारवाईचे गंडांतर आले आहे. अशा क्लासेसचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
नाशिक : अग्निसुरक्षा साधने नसल्याने शहरातील सुमारे पन्नास खासगी क्लासेसवर कारवाईचे गंडांतर आले आहे. अशा क्लासेसचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
सुरत येथील एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये आग लागल्याने अनेक विद्यार्थ्यांनी भीतीपोटी इमारतीवरून उड्या मारल्या त्यात अनेकांचा अंत झाला होता. त्यानंतर नेहमी हॉस्पिटलच्या मागे लागलेल्या महापालिकेने खासगी कोचिंग क्लासेस चालकांकडे मोर्चा वळवला होता. खासगी क्लासेसची तपासणी करून त्यानंतर अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. एकूण ३१९ पैकी ४२ क्लासेसमध्येच अग्निप्रबंधक उपाययोजना केल्याचे आढळले होते. उर्वरित क्लासचालकांना नोटिसा बजावल्यानंतर त्यांनी धावपळ सुरू केली. त्यामुळे २६९ क्लासचालकांनी उपाययोजना करण्याची तयारी दर्शविली असून, ७९ क्लासचालकांनी महापालिकेला त्याबाबत लेखी कळवले आहे आणि कार्यवाही करण्यासाठी अवधी मागितला आहे. परंतु ५० क्लासचालकांनी मात्र काहीच दाद दिली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरू झाली आहे. संबंधितांचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विशेष म्हणजे महापालिकेच्या तपासणीत अनेक क्लासचालकांनी परस्पर बेकायदा बांधकाम करण्यात आल्याचेही आढळले आहे. मूळ रचनेतील हे बदल तपासण्यात येणार असून नियमबाह्य बांधकाम पाडण्यात येणार आहे. त्यास विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
स्वागत हाईटला पाणीपुरवठा सुरू
सातपूर भागातील कामगार भागातील स्वागत हाईट्स या अपार्टमेंटचा पाणीपुरवठा तब्बल १८ महिन्यांनंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यामुळे सुरू झाला आहे. अग्निशमन नियमांचा भंग करून वाढीव बांधकाम करण्यात आल्याने या इमारतीचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. येथील सदनिकाधारकांचे आपसातील आणि विकासकाशी असलेले वाद, न्यायालयातील दावे प्रतिदावे यामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतरही त्यावर कोणीही अधिकारी सवलत देण्याचे धाडस करीत नव्हते.