नाशिकमध्ये लॉकडाऊन नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:15 AM2021-04-02T04:15:34+5:302021-04-02T04:15:34+5:30
जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता मागील आठवड्यातच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कठोर निर्बंधाचे संकत दिले होते. त्यामुळे गुरुवारी ...
जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता मागील आठवड्यातच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कठोर निर्बंधाचे संकत दिले होते. त्यामुळे गुरुवारी (दि. १) सायंकाळी नियोजन भवनातील कोरोना आढावा बैठकीनंतर ते काय काय निर्णय घेतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागले होते. मात्र, जिल्ह्यात लॉकडाऊन लागू केला जाणार नसल्याचे सांगून त्यांनी चर्चेला विराम दिला. लॉकडाऊन एकदम लागू करता येणार नाही, तशी वेळ आलीच तर तीन ते चार दिवस आगोदर नियोजन करावे लागते. सद्य:स्थितीत कोरेाना रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शोधून काढणे, योग्य विलगीकरण करणे, याबरोबरच गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठीच्या सर्व प्रकारच्या उपायोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने सिव्हीलमध्ये ३००, तर मनपा आणि अन्य खासगी रुग्णालयांमध्ये किमान १००० खाटा वाढविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. २२४ व्हेंटिलेटर बेडस्चा वापर पुर्ण क्षमतेने करण्याबाबतची कार्यवाही करावी असेदेखील आदेश पालकमंत्र्यांनी दिले.
जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहेच, शिवाय उत्तर महाराष्ट्रातूनही अनेक रुग्ण दाखल होत आहेत. या सर्वांनाच आरोग्य सुविधा पुरविण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे रुग्णांना बेड मिळाला नाही अशी तक्रार राहणार नाही. यासाठी जास्तीत जास्त रुग्ण खाटांचे नियोजन करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात किमान एक हॉस्पिटल अधिग्रहित करण्याबरोबरच जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के बेडस् हे ताब्यात घेण्याची कारवाई करून जास्तीत जास्त बेडस् उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी माध्यमांना सांगितले.
--इन्फो--
खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेडस् घेणार
रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याने आता खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के बेडस् राखीव ठेवण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना मनपा आयुक्तांना करण्यात आली. सरकारी दराप्रमाणे रुग्णांकडून दर आकारणी केली जाईल याची दक्षता घेण्यबरोबरच खासगी रुग्णालयांकडून जादा बिल घेतले जात असेल तर अशा तक्रारींची दखल घेण्याची सूचनादेखील पालकमंत्र्यांनी केली. डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आणि एसएमबीटी हे दोन्ही पूर्णवेळ कोविड रुग्णालये म्हणून कार्यरत असतील, असेही त्यांनी सांगितले.
--इन्फो--
.. तर त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करा
विलगीकरणात असलेले रुग्ण खरोखरीच विलगीकरणात आहेत का, याबाबतची चौकशी करून गरज असेल अशा रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याची कार्यवाही करावी, मनपा आयुक्तांनी त्यांची व्यवस्था करावी, अशा सक्त सूचना पालकमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना दिल्या आहेत.
--इन्फो--
अधिकारी फिल्डवर असावेत
जिल्हाधिकाारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, तसेच ज्यांच्यावर कोरोना नियंत्रणाची जबाबदारी आहे, अशा अधिकाऱ्यांनी अर्धा दिवस फिल्डवर असले पाहिजे. अर्धा दिवसच त्यांनी कार्यालयात थांबावे अशा सूचना करण्यात आल्या.
--इन्फो-
संबंधितांवर गुन्हे दाखल करणार
महापालिका प्रवेशद्वारावर आणलेल्या रुग्णाचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाल्याप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. रुग्णाला मनपा मुख्यालयात आणल्यापासूत ते संबंधिताला जिल्हा रुग्णालयात बेड नाकारण्यात आला का? यात नेमके काय चुकले याची पोलीस चौकशी करतील, असे भुजबळ यांनी सांगितले.
--इन्फो--
तीन दिवसांनी घेणार आढावा
कोरोना आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याबरोचर कारवाईच्यादेखील सूचना दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांना नियोजनाची आणि कारवाईचीदेखील जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या कामकाजाचा आढावा पुढील तीन दिवसांनंतर घेतला जाणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
--कोट--
लॉकडाऊन लागू केला म्हणजे कोरोनाची साखळी तुटेल असे नाही. कोरोना हा राहणारच आहे. शेवटचा रुग्ण कोरोनामुक्त होईपर्यंत लॉकडाऊन लागू करणे शक्य नाही. एका रुग्णाकडून तो दुसऱ्याला बाधित करणारच आहे. म्हणून कोरोना कधी संपुष्टात येईल हे देखील सांगता येणार नाही. त्यामुळे रुग्ण आढळले म्हणून लॉकडाऊन करा, असे म्हणणे हे संयुक्तिक होणार नाही.
- छगन भुजबळ, पालकमंत्री