यंदाही परिक्रमा नसल्याने एस.टी. फेरी हुकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:18 AM2021-08-23T04:18:15+5:302021-08-23T04:18:15+5:30
नााशिक: त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी फेरी यंदा होणार नसल्याने त्याचा फटका एस. टी. महामंडळाला देखील बसणार आहे. दरवर्षी श्रावणातील तिसऱ्या ...
नााशिक: त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी फेरी यंदा होणार नसल्याने त्याचा फटका एस. टी. महामंडळाला देखील बसणार आहे. दरवर्षी श्रावणातील तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वरला भाविकांची मोठी गर्दी होत असते परंतु यंदा काेरोनामुळे परिक्रमेला बंदी असल्यामुळे महामंडळाला कोट्यवधींच्या उत्पन्नाला मुकावे लागले आहे.
श्रावणमासातील तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वरला भाविकांची मेाठी रिघ असते. नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील असंख्य भाविक येथील ब्रह्मगिरी फेरीसाठी येत असतात. नाशिक शहरातून त्यांची वाहतूक करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बसेसचे नियोजन करून प्रवाशांची वाहतूक केली जाते. दरवर्षी या विशेष वाहतुकीतून महामंडळाला ८० ते ९० लाखांचे उत्पन्न होते. परंतु शासनाच्या बंदीमुळे महामंडळाला देखील फटका बसला आहे.
कोविड विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याबाबत आदेश यापूर्वीच लागू करण्यात आलेले आहेत. श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसर, कुशावर्त तीर्थ परिसर, ब्रम्हगिरी परिक्रमा मार्ग व इतर अनुषांगिक धार्मिक स्थळे परिसरात कलम १४४ लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे यावर्षी श्रावणमासात भाविकांची गर्दी होऊ शकलेली नाही.
या निर्बंधाचा फटका राज्य परिवहन महामंडळाला चांगलाच बसला आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारला महामंडळाकडून गोल्फ क्लब मैदानावर तात्पुरता डेपो उभारून तेथून प्रवाशांची वाहतूक केली जाते. यासाठी अतिरिक्त गाड्या आणि कर्मचाऱ्यांची देखील नेमणूक केली जाते. परंतु यंदा कोरोना निर्बंधामुळे महामंडळाला हक्काच्या उत्पन्नाला मुकावे लागले आहे.
--इन्फो--
यात्रा, जत्रांच्या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न मिळते. त्यातही नाशिक जिल्ह्यात अनेक मोठ सण-उत्सव होत असल्याने नाशिक विभागीय एस.टी.कडून बसेसचे नियोजन केले जाते. त्यातील तिसऱ्या श्रावण सोमवारची यात्रा एस. टी. महामंडळाला उत्पनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते; परंतु गेल्या दोन वर्षांपासून महामंडळाला हक्काच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.