फाळके यांच्या जन्मभूमीत साधा त्यांचा पुतळाही नाही ; फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मुनीराम अग्रवाल यांनी व्यक्त केली खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 07:50 PM2020-05-09T19:50:25+5:302020-05-09T19:54:21+5:30
नाशिक : चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची नाशिकही जन्मभूमी! गेल्या ३० एप्रिलपासून त्यांच्या दीडशेव्या जयंती वर्षाला प्रारंभ झाला. मात्र, शासनाला आणि फिल्म सिटीला याचा कितपत गंध आहे, याविषयी शंका आहे. फाळके यांच्या जन्मभूमीत त्यांचे नावाचे एक स्मारक असले तरी त्याची दुरवस्था झाली आहे, शिवाय त्यांचा साधा पुतळाही शहरात नाही अशी खंत फाळके फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मुनीराम अग्रवाल यांनी व्यक्त केली. या वर्षात किमान नव्या पिढीतील कलावंतांना फाळके कळावेत याठिकाणी फाळके यांच्या चित्रपटांचे महोत्सव किमान मेट्रो सिटीत भरावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रश्न : चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची दीडशेवी जयंती उत्सवाला प्रारंभ झाला आहे त्याबद्दल काय वाटते?
अग्रवाल : चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके हे या चित्रपटसृृष्टीचे जनक आहेत. त्यांंनी अत्यंत प्रतिकूल काळात चित्रपट तयार केलेत. आजचे चित्रपटसृष्टीचे स्वरूप त्यांच्यामुळेच उभे राहिले आहेत. त्यामुळे या वर्षात नव्या पिढीला फाळके कळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नाशिकमध्ये १९७९ मध्ये फाळके फिल्म सोसायटी स्थापन झाल्यानंतर आम्ही अनेक उपक्रम राबविले. फाळके यांचे उचित स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न केले. नाशिक महापालिकेने एक स्मारक उभे केले असले तरी त्यात साधा पुतळाही नाही. तेथे नव्हे तर नाशिक शहरातदेखील एकही पुतळा नाही, त्यामुळे त्याची कुठे तरी दखल घेतली पाहिजे.
प्रश्न : फाळके यांच्या विषयीची माहिती कलावंतांपर्यंत पोहोचविण्यासाठी काय केले पाहिजे असे वाटते?
अग्रवाल : फाळके यांच्याविषयी जुन्या कलाकारांना आदर आहे. स्मारक उभारण्याच्या निमित्ताने आम्ही धर्मेंद्र यांच्यापासून विनोद खन्ना, आशा पारेख अशा सर्वांना वेळोवेळी भेटलो. त्यांनी मदत देण्याची तयारी दर्शविली. मात्र त्यादृष्टीने शासन आणि प्रशासनाने तयारी करणे आवश्यक आहे. देशभरात फाळके यांच्या चित्रपटांचे महोत्सव भरवले पाहिजे. तसेच प्रत्येक चित्रपटगृहात फाळके यांची प्रतिमा किंवा पुतळा उभारलाच पाहिजे. याशिवाय चित्रपट सुरू करताना प्रमाणपत्र प्रथम दाखविले जाते. त्याचवेळी फाळके यांचे छायाचित्र दाखवून त्याखाली चित्रपटसृष्टीचे जनक असल्याचे नमूद केले पाहिजे.
प्रश्न : फाळके यांच्या प्रचार प्रसारासाठी आपल्या सोसायटीने काय कार्य केले आहे?
अग्रवाल : १९७९ मध्ये स्वातंत्र्यसैनिक तथा ज्येष्ठ पत्रकार द. शं. पोतनीस, मधुकर झेंडे, विजय जानोरकर, वसंतराव चुंबळे अशा आम्ही अनेकांनी ही संस्था स्थापन केली. नाशिकच्या प्रत्येक चित्रपटगृहात मान्यवरांच्या हस्ते फाळके यांची प्रतिमा भेट देऊन ती लावण्यास सांगितले. जगभरातील क्लासिक चित्रपट आधी शासकीय कन्या विद्यालय आणि त्यानंतर सर्कल चित्रपटगृहात दाखविले आहेत. फाळके स्मारकासाठी माजी पंतप्रधान (स्व.) राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव, बलराम जाखड, शरद पवार यांच्याकडे नाशिकचे माजी खासदार (कै.) वसंत पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी या कामी मदत केली. स्मारकात फाळके यांचा जीवनपट चित्ररूपाने मांडण्यात आला, असे अनेक उपक्रम राबविले आहेत.
मुलाखत- संजय पाठक