निर्यात बंदीनंतरही कांदा दरात फारसा फरक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 01:59 AM2019-10-01T01:59:24+5:302019-10-01T02:00:15+5:30

कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी तातडीने कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोमवारी त्याचे परिणाम जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये दिसून आले असले तरी, कांदा दरात फारसा फरक पडलेला दिसून आला नाही.

 There is not much difference in onion prices even after export ban | निर्यात बंदीनंतरही कांदा दरात फारसा फरक नाही

निर्यात बंदीनंतरही कांदा दरात फारसा फरक नाही

Next

नाशिक : कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी तातडीने कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोमवारी त्याचे परिणाम जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये दिसून आले असले तरी, कांदा दरात फारसा फरक पडलेला दिसून आला नाही. निर्यातबंदीची घोषणा होऊनही कांद्याला सरासरी ३३०० रुपये, तर सर्वाधिक ३६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाले. निर्यातबंदीचा नव्हे तर केंद्राने साठ्यावर घातलेल्या निर्णयाचा परिणाम काही बाजार समित्यांमध्ये दिसून आला. व्यापाऱ्यांनी आधीच खरेदी केलेला कांदा त्यांच्याकडे पडून असल्याने नव्याने कांदा खरेदी केला तर ५०० क्विंटल साठ्याच्या मर्यादेचे उल्लंघन होण्याची भीती असल्याने काही ठिकाणी कांदा खरेदीत हात आखडता घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले.
देशात नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याचा तुटवडा जाणवत असल्याने महाराष्टÑातील कांद्याला मागणी वाढली. शेतकऱ्यांनी टप्याटप्याने कांदा विक्रीस आणला तर दर टिकून राहातील. शिवाय त्यात वाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे मत काही बाजार समित्यांच्या सचिवांनी व्यक्त केले आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीमध्ये गेल्या शुक्रवारी उन्हाळ कांद्याला कमीत कमी ११००, जास्तीत जास्त ३८८०, तर सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. रविवारी निर्यातबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर सोमवारी प्रथमच येथे कांद्याचे लिलाव झाले. सोमवारी लासलगावी २८७ वाहनांतून कांद्याची आवक झाली. त्याला कमीत कमी १००२, जास्तीत जास्त ३५०१, तर सरासरी ३२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत कांदा दरात फारसा फरक पडला नसला तरी मागील आठ दिवसांचा आढावा घेतला तर हा फरक क्विंटलमागे ६०० रुपयांचा दिसून येतो. पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीमध्ये गेल्या शुक्रवारी कांद्याला कमीत कमी २१००, अधिकाधिक ३९९५, तर सरासरी ३५५१ रुपये प्रतिक्विंटल दर होते. सोमवारी कमीत कमी १९८०, सर्वाधिक ३६००, तर सरासरी ३३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर जाहीर झाल्याने येथेही कांदा दरात फारसा फरक पडलेला नसल्याचे दिसून येते.
नांदगाव बाजार समितीमध्ये मात्र आज स्थिती वेगळीच दिसून आली. शुक्रवारी येथे कांद्याला ३६४० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. सोमवारी मात्र येथे सर्वाधिक दर ३६९१ रुपयांपर्यंत जाहीर झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. सरासरी भावात मात्र १६ रुपयांनी फरक पडल्याचे दिसून आले. शुक्रवारी येथे सरासरी दर ३३४१ रुपयांपर्यंत जाहीर झाला होता. सोमवारी मात्र यात १६ रुपयांनी फरक पडून ३३२५ रुपये दर जाहीर झाला. सटाणा बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात लिलाव सुरू झाले नाही. मात्र दुपारनंतर येथे ७० ते ७२ वाहनांतील कांदा लिलाव झाला. त्याला सर्वाधिक ३५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. येथे सरासरी भाव २८००-२९०० रुपयांपर्यंत होते. चांदवड बाजार समितीचे कामकाज सोमवारी बंद होते.
देशात आधीच कांद्याची उपलब्धता कमी आहे. त्यात आता चाळीत साठविलेला कांदा खराब होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे कांद्याचा आणखी तुटवडा जाणवणार असल्याने शेतकºयांनी कांदा दराबाबत घाबरून न जाता आपला माल प्रतवारी करून टप्याटप्याने बाजारात आणला तर याहीपेक्षा अधिक चांगला भाव मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.
साठवणूक मर्यादेचा परिणाम नाही
सध्या व्यापारी ज्या दराने कांदा खरेदी करत आहेत ते पाहता कुणीही कांदा साठवून ठेवण्याच्या मन:स्थितीत नाही. कांदा नाशवंत असल्यामुळे खराब होणे, वजनात घट होते यामुळे साठवणुकीच्या मर्यादेचाही फारसा परिणाम होईल असे वाटत नाही, असे लासलगावमधील कांदा व्यापाºयाने सांगितले.

Web Title:  There is not much difference in onion prices even after export ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.