दंतोपचारांना विम्याचे कवच अद्याप नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 01:03 AM2018-10-18T01:03:41+5:302018-10-18T01:04:17+5:30
भारतीय विमा नियामक प्राधिकरणने दंतोपचारांना आरोग्य विम्यात समाविष्ट करावे, याबाबत सूचना केल्या असल्या तरी अद्याप विम्या कंपन्यांच्या मुख्यालयात याबाबत कुठल्याही हालचाली नसल्याने विमा ग्राहकांना या उपचारांच्या खर्चाबाबत विम्या कंपन्यांची मदत सध्यातरी मिळणार नसल्याचे दिसून येत आहे.
नाशिक : भारतीय विमा नियामक प्राधिकरणने दंतोपचारांना आरोग्य विम्यात समाविष्ट करावे, याबाबत सूचना केल्या असल्या तरी अद्याप विम्या कंपन्यांच्या मुख्यालयात याबाबत कुठल्याही हालचाली नसल्याने विमा ग्राहकांना या उपचारांच्या खर्चाबाबत विम्या कंपन्यांची मदत सध्यातरी मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. २८ आॅगस्ट रोजी आयआरडीए अर्थात भारतीय विमा नियामक प्राधिकरण यांनी विमा कंपन्यांना याबाबत सूचना केल्या होत्या. खर्चाचा आकडा जास्त असल्याने उपचार लांबणीवर टाकलेल्या विमा ग्राहकांना या निर्णयाने दिलासा वाटला होता. मात्र आॅक्टोबर संपत आला तरी याबाबत विमा कंपन्यांना त्यांच्या मुख्यालयांमधून याबाबत कुठलीही सूचना मिळालेली नाही. त्यामुळे ग्राहकांनाही तशीच उत्तरे दिली जात आहेत. विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना याविषयी विचारले असता, मुख्यालयांमध्ये याबाबत सविस्तर नियोजन सुरू असून, लवकरच त्याबाबतचे धोरण जाहीर केले जाणार असल्याचे उत्तर ऐकायला मिळत आहे. बहुतांशी आरोग्य विमा कंपन्यांची मुख्यालये ही चेन्नई, कोलकाता, चंदीगढ, हैदराबाद आदी ठिकाणी आहेत. महाराष्टतील ग्राहकांना याबाबत पाठपुरावा करणे शक्य नसल्याने स्थानिक कार्यालयांमध्येच विचारणा करत ते निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. दंतोपचाराबरोबरच वंध्यत्व निवारण उपचार, स्टेमसेल, मानसोपचार यांचाही समावेश करावा, अशा सूचना आहेत. मात्र अद्याप याबाबत कुठलीही स्पष्टता नसल्याचे चित्र आहे.