जिल्ह्यात १३१ गावांना अद्याप टंचाई
By admin | Published: June 29, 2017 01:15 AM2017-06-29T01:15:04+5:302017-06-29T01:15:15+5:30
नाशिक : जून महिन्याची सरासरी पावसाने ओलांडली असली तरी, जिल्ह्यातील १३१ गावे, वाड्यांना ३८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जून महिन्याची सरासरी पावसाने ओलांडली असली तरी, जिल्ह्यातील १३१ गावे, वाड्यांना ३८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जून महिन्याची पावसाने २४२३ मिलिमीटरची सरासरी ओलांडली गेली. नाशिक, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, चांदवड, मनमाड तालुक्यांमध्ये शंभर टक्क्याहून अधिक पाऊस झाल्यामुळे नद्या, नाल्यांना तसेच विहिरींना पाणी उतरल्याने त्याचा परिणाम टंचाईग्रस्त गावांवर झाला आहे. त्याचबरोबर धरणांच्या पाणी साठ्यातही कमालीची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ८७ गावे, ८१ वाड्यांना ५८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता.परंतु त्यातील २० टॅँकर कमी करण्यात आले. सध्या दिंडोरी, इगतपुरी, कळवण, नाशिक, निफाड, पेठ, सुरगाणा, त्र्यंबक या आठ तालुक्यात टॅँकर नाही, तर बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सिन्नर व येवला या तालुक्यातील ६३ गावे, ६८ वाड्यांना ३८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.