तिकडे यात्रेतून ‘संघर्ष’, इकडे भोजनासोेबत विचार विमर्श
By admin | Published: April 8, 2017 12:31 AM2017-04-08T00:31:09+5:302017-04-08T00:31:22+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेतील भाजपा-राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या सदस्यांनी मंत्र्यांनी बोलविलेल्या स्नेहभोजनास हजेरी लावल्याने शिवसेना-माकपाने त्यांच्यावर टीका केली आहे.
नाशिक : एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभर फिरून संघर्ष यात्रा काढून राष्ट्रवादी व कॉँग्रेसचे नेते सरकारविरोधात आवाज बुलंद करीत असताना दुसरीकडे मात्र नाशिक जिल्हा परिषदेतील भाजपा-राष्ट्रवादी आणि फुटीर कॉँग्रेसच्या सदस्यांनी भाजपाच्या मंत्र्यांनी बोलविलेल्या स्नेहभोजनास हजेरी लावल्याने शिवसेना-माकपाने त्यांच्यावर टीका केली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपा-राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या फुटीर सदस्यांनी बहुमत जमवित चार विषय समित्यांवर कब्जा केल्याने शिवसेना-कॉँग्रेस, माकपाचा तिळपापड होत असून, भाजपा-राष्ट्रवादी कॉँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना-कॉँग्रेस व माकपा सोडत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (दि. ७) मुंबईला सह्णाद्रीवर नवनियुक्त भाजपा-राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच निवडून आलेल्या सर्वच सदस्यांना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सायंकाळी स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले होते. या स्नेहभोजनाआधी भाजपा-राष्ट्रवादी तसेच फुटीर कॉँग्रेसच्या सदस्यांचा ओळख परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करून देण्यात येणार होता.
या स्नेहभोजनासाठी भाजपासोबतच राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्व सदस्य व दोघे पदाधिकारी तसेच कॉँग्रेसच्या फुटीर तीनही सदस्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारी भाजपासोबत राष्ट्रवादीचे बहुतांश सदस्य व दोघे पदाधिकारी, कॉँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यासह तीनही सदस्यांनी हजेरी लावली. त्यामुळे विरोधकांना आयतीच संधी मिळाली. राज्यभरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी व कॉँग्रेसचे नेते पायी फिरून संघर्ष यात्रा काढत आहेत.
दुसरीकडे याच राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या नाशिक जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांनी भाजपा मंत्र्यांनी बोलविलेल्या स्नेहभोजनाला हजेरी लावून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आणि त्यांच्याच वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला हरताळ फासल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच याबाबत राष्ट्रवादीच्या व कॉँग्रेसच्या वर्तुळात या स्नेहभोजनाची चर्चा आहे. (प्रतिनिधी)