नाशिकच्या वनाच्छादनात होते घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 01:09 AM2020-03-21T01:09:39+5:302020-03-21T01:09:58+5:30
एकेकाळी दंडाकारण्य अशी ओळख असलेल्या नाशिकचे वनाच्छादन दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे भारतीय वन सर्वेक्षण या राष्टÑीय संस्थेने नुकत्याच जारी केलेल्या अहवालाच्या आकडेवारीवरून दिसून येते. यामुळे नाशिककरांना वनाच्छादन वाढविण्यासाठी जिल्हास्तरावर प्रयत्न करावे लागणार आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत नाशिकचे वनाच्छादन मागील दोन वर्षांत दीड ते पावणे दोन टक्क्यांनी घटले आहे.
नाशिक : एकेकाळी दंडाकारण्य अशी ओळख असलेल्या नाशिकचे वनाच्छादन दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे भारतीय वन सर्वेक्षण या राष्टÑीय संस्थेने नुकत्याच जारी केलेल्या अहवालाच्या आकडेवारीवरून दिसून येते. यामुळे नाशिककरांना वनाच्छादन वाढविण्यासाठी जिल्हास्तरावर प्रयत्न करावे लागणार आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत नाशिकचे वनाच्छादन मागील दोन वर्षांत दीड ते पावणे दोन टक्क्यांनी घटले आहे.
फॉरेस्ट सर्वे आॅफ इंडिया अर्थात भारतीय वन सर्वेक्षण (एफएसआय) ही कें द्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाची अंतर्गत एक प्रमुख संस्था आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित कामकाज करणाऱ्या या संस्थेवर देशाच्या वन संसाधनाचे नियमित मूल्यांकन व बदलांच्या निरीक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याव्यतिरिक्त प्रशिक्षण, संशोधन आणि विस्तार सेवादेखील प्रदान करण्याचे कार्य या शासकीय संस्थेद्वारे केले जाते.
२०१७ सालानंतर २०१९अखेर या संस्थेकडून संपूर्ण देशातील विविध राज्ये व त्यामधील जिल्ह्यांचे भौगोलिक क्षेत्रानुसार घनदाट वनाच्छादन, मध्यम स्वरूपाचे वनाच्छादन आणि विरळ जंगल या तीन गटांमध्ये प्रत्येकी चौरस किलोमीटर क्षेत्राची मोजदाद करण्यात आली. तो अहवाल अलीकडेच संस्थेने प्रसिद्ध केला आहे.
सर्वेक्षण अहवाल असा...
वन सर्वेक्षण अहवालात नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र १५ हजार ५३० इतके दाखविण्यात आले आहे. त्या तुलनेत जिल्ह्यात कोठेही घनदाट वृक्षराजी अस्तित्वात नसल्याचे अहवाल सांगतो. तसेच ३४६.६४ चौरस किलोमीटर इतके क्षेत्र जिल्ह्यात मध्यम दाट स्वरूपाच्या वनाच्छादनाचे आहे. विरळ वनाच्छादन ७३०.२१ चौरस किलोमीटरवर पसरलेले दिसून येते. एकूण जिल्ह्यात १,०७६.५५ चौ.कि.मी. क्षेत्रावर वनाच्छादन टिकून आहे. भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत ६.९३ टक्के इतकेच वनाच्छादन शिल्लक असल्याचे अहवालात नमूद आहे.