शहरात डासांचा वाढला उपद्रव, घनतेत झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:53 AM2019-07-29T00:53:17+5:302019-07-29T00:53:51+5:30
दर पावसाळ्यानंतर महापालिकेची डेंग्यूमुळे डोकेदुखी वाढत असते. आताही वीसच्यावर डेंग्यू रुग्णांची संख्या पोहोचली आहे. दुसरीकडे डासांची संख्या प्रचंड वाढली असून, वैद्यकीय विभागाच्या म्हणण्यानुसार घनता चार इतकी आहे. जी धोक्याच्या जवळपास आहे.
नाशिक : दर पावसाळ्यानंतर महापालिकेची डेंग्यूमुळे डोकेदुखी वाढत असते. आताही वीसच्यावर डेंग्यू रुग्णांची संख्या पोहोचली आहे. दुसरीकडे डासांची संख्या प्रचंड वाढली असून, वैद्यकीय विभागाच्या म्हणण्यानुसार घनता चार इतकी आहे. जी धोक्याच्या जवळपास आहे.
नाशिक शहरात गेल्या काही वर्षांपासून डेंग्यूचे रुग्ण सातत्याने त्रासदायक आहेत. गेल्या वर्षी अडीचशेहून अधिक डेंग्यू रुग्ण आढळले होते. यंदा त्या तुलनेत प्रमाण कमी असले तरी मध्यंतरी सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर हे प्रमाण वाढतच चालले आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वीसपेक्षा अधिक असल्याचे महापालिकेचे म्हणणे असले तरी त्यापेक्षा अधिक संख्या असल्याचे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सर्वाधिक उपद्रव डासांचा होत आहे. शहरात डासांची संख्या प्रचंंढ वाढली आहे.
महापालिकेने गेल्याच महिन्यात एक लाख पाच हजार घरांना भेटी देऊन डास प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचा दावा केला होता.
मात्र त्यानंतरदेखील डासांचे प्रमाण वाढतच असून, प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डासांची सध्याची घनता चार इतकी आहे. म्हणजेच डासांची संख्या धोकादायक पातळीवर असून, प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जावी, अशी मागणी होत आहे.