बाळासाहेबांशी मतभेद होते, तितकेच प्रेमही! - छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 12:20 PM2022-07-09T12:20:50+5:302022-07-09T12:21:02+5:30
शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होतो. काही वैचारिक मतभेद झाल्याने शिवसेना सोडली - भुजबळ
नाशिक : शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होतो. काही वैचारिक मतभेद झाल्याने शिवसेना सोडली. बाळासाहेब ठाकरेंना कोणत्या परिस्थितीत अटक करण्यात आली हे त्यावेळचे जाणकार सांगतीलच. परंतु जितके बाळासाहेबांशी मतभेद होेते, तितकेच प्रेमही होते, हे नंतरच्या काळात साऱ्यांनाच ठाऊक झाले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना अटक करणारे भुजबळ कसे चालले, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारणारे सेनेचे मंत्री महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये माझ्या मांडीला मांडी लावून का बसले होते, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सेनेच्या बंडखोर आमदारांना विचारला आहे.
सेनेच्या काही बंडखोर आमदार व मंत्र्यांनी पक्ष सोडण्यासाठी छगन भुजबळ यांचे नाव पुढे करून त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली ते भुजबळ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कसे चालले, असा प्रश्न विचारल्याने त्याला प्रत्युत्तर भुजबळ यांनी दिले.
भुजबळ म्हणाले, मंडल आयोगावरून बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाले व आपण सेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, हा सारा इतिहास राज्यातील जनतेला ठाऊक आहे. त्यानंतर ठाकरे यांच्याशी माझे भांडण जगजाहीर झाले. त्यांनी मुखपत्रातून आरोप केल्यामुळे मी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला, तर मुंबई दंगलीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन तत्कालीन काँग्रेस सरकारने जनतेला दिले होते. त्यामुळे मी गृहमंत्री असताना तत्कालीन मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी आपल्यासमोर फाईल ठेवली. त्याचवेळी मी बाळासाहेब ठाकरेंना अटक न करण्याचे व कायद्याने अटक झाली तर त्यांना पोलीस कोठडी अथवा तुरुंगात न टाकता ‘मातोश्री’वरच ठेवण्याचे आदेश गृहखात्याला दिले होते. त्यामुळे बाळासाहेब यांना अटक झाली तरी, त्यांना न्यायालयाने जामिनावर सोडलेदेखील, असेही त्यांनी सांगितले.
सेनेत सारे काही ‘ऑल वेल’ होईल
शिवसेना संपणार नाही, कोणत्याही मराठी व्यक्तीला सेना संपवावी, असे वाटणार नाही. याचा पुनरुच्चार करून भुजबळ यांनी सेनेतील वादळ काही दिवसातच शांत होईल, असा विश्वास व्यक्त केला.