राज्यातील १२१ आदिवासी आश्रमशाळा होणार आदर्श आश्रमशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 01:27 AM2021-11-26T01:27:07+5:302021-11-26T01:27:30+5:30
राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत ४९७ आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल स्कूल सुरू आहेत. या शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात येते. या आश्रमशाळांपैकी १२१ आश्रमशाळा आदर्श म्हणून विकसित करण्यात येणार आहेत.
नाशिक : राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत ४९७ आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल स्कूल सुरू आहेत. या शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात येते. या आश्रमशाळांपैकी १२१ आश्रमशाळा आदर्श म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. याबाबत गुरुवारी अध्यादेश जारी करण्यात आला आहे. याअंतर्गत निवड झालेल्या शाळांमध्ये भौतिक आणि शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. निवड झालेल्या शाळांमध्ये नाशिक विभागातील ५६ शाळांचा समावेश असून, सर्वाधिक शाळा कळवण प्रकल्पातील (१६) आहेत. नाशिक प्रकल्पातील केवळ नऊ शाळांचा यात समावेश होऊ शकला आहे. भौतिक सुविधांमध्ये प्रत्येक आदर्श आश्रमशाळेकरिता एक सुसज्ज इमारत असावी. त्यामध्ये आयसीटी लॅब, ग्रंथालय, संगीत व कला कक्ष असावेत. निवासी मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची इमारत असावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी निवासव्यवस्था तसेच प्रत्येक आश्रमशाळेमध्ये भोजनालय व बहुउद्देशीय सभागृह असावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक सुविधांमध्ये आदर्श आश्रमशाळांमधून एकविसाव्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उत्तम शैक्षणिक वातावरण निर्माण करावे. कमी वेळेत जास्तीत जास्त विषयाचे शिक्षण अवगत करता यावे याकरिता विद्यार्थ्यांना रचनात्मक शिक्षण देण्यात यावे यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. आदर्श आश्रमशाळांच्या देखरेखीसाठी आदिवासी विकास आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. यात अपर आयुक्त आणि प्रकल्प अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग अधिक सुखकर होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.