समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी १४४० किमीचा सर्व्हिस रोड होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:14 AM2021-05-14T04:14:59+5:302021-05-14T04:14:59+5:30
सिन्नर: समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी १४४० किमीचा सर्व्हिस रोड होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, समृद्धी महामार्गालगत शेती असलेल्या तालुक्यातील ...
सिन्नर: समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी १४४० किमीचा सर्व्हिस रोड होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, समृद्धी महामार्गालगत शेती असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांची समस्या दूर करतानाच त्याचा फायदा राज्यातील बारा जिल्ह्यांतील ३९२ गावांना होणार आहे. मुंबईत रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्ण मोपलवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी प्रस्तावित असलेल्या संरक्षक भिंतींमुळे शेतकऱ्यांची शेतातील वहिवाट बंद होणार होती. शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांना दळणवळणासाठी सर्व्हिस रोड बांधावा व त्यासाठी दहा फुटांची जागा सोडून संरक्षक भिंत आतमध्ये घेण्यात यावी, अशी मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केली होती. कोकाटे यांनी शासनास धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडल्याने ७२० किमीच्या या द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजू मिळून सुमारे १४४० किमीचा सर्व्हिस रोड होणार आहे. युती शासनाच्या काळात समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित करण्यात येऊन त्याचे कामही सुरू झाले. शासनाने संपादित केलेली सर्व जमीन या महामार्गासाठी वापरण्याचे निश्चित झाले. ठिकठिकाणी जमीन संपादित झाली. जमिनीचे सपाटीकरण झाले, तोपर्यंत शेतकऱ्यांना स्वतःच्या किंवा दुसऱ्यांच्या शेतामध्ये ये-जा करण्यासाठी भविष्यात काही अडचणी येतील, असे वाटले नव्हते. मात्र, भराव टाकून रस्ता उंच बनल्यानंतर महामार्गासाठी जमीन जिथपर्यंत संपादित आहे तिथपर्यंत म्हणजे अगदी शेतकऱ्यांच्या बांधाच्या कडेपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी पूर्णतः आरसीसी पद्धतीची सात फूट उंचीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू झाले. मात्र, यामुळे शेतकऱ्यांची वहिवाट बंद पडणार होती. शेतकऱ्यांनी कोकाटे यांना भेटून त्यांच्याकडे आपली कैफियत मांडली. ही गोष्ट शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने कोकाटे यांनी रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्ण मोपलवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही बाब मांडली. शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांसाठी सर्व्हिस रोड बनविण्यासाठी दहा फूट जागा सोडून संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी मोपलवार यांनी तत्काळ मान्य करत समृद्धी महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यानुसार काम करण्याचे आदेश दिले.
--------------
अशा पद्धतीने झाला धोरणात्मक निर्णय
आमदार कोकाटे यांनी संरक्षक भिंत शेतकऱ्यांच्या बांधाजवळ बांधली जात असल्याने शेतात ये-जा करण्यासाठी रस्ताच राहणार नसल्याने त्यांची वहिवाट बंद पडेल. त्यातून अनेक शेतकऱ्यांना जमीन कसता येणार नाही. उपजीविका बंद पडल्यास शेतकरी उद्ध्वस्त होईल. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा राग अनावर होऊन ते उद्रेक करून ही संरक्षक भिंत पाडून टाकतील. त्यातून महामार्गाचे नुकसान होईलच. मात्र, या महामार्गाने ताशी १५० किमी वेगाने वाहने धावत असताना अचानक मधूनच जनावरे, माणसे व वाहने आडवी गेली तर भीषण असे अपघात होऊ शकतात. त्यातून जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दहा फुटांच्या सर्व्हिस रोडसाठी जागा सोडण्यात यावी व संरक्षक भिंत आतमध्ये बांधण्यात यावी, म्हणजे महामार्गाचे व शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही. हे काम फक्त सिन्नर विधानसभा मतदारसंघातील ८५ किमी महामार्गापुरते न करता संपूर्ण राज्यातील ७२० किमी रस्त्यासाठी करण्यात यावे व तसा धोरणात्मक निर्णय घ्यावा, ही मागणी आमदार कोकाटे यांनी लावून धरल्याने या बैठकीत तसा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.
-----------
धोरणात्मक निर्णय
बारा जिल्ह्यांतील ३९२ गावांना फायदा समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूरदरम्यान बारा जिल्ह्यांतून जात आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा व नागपूर या जिल्ह्यांतील जवळपास २६ तालुके व ३९२ गावांतील शेतकऱ्यांना या धोरणात्मक निर्णयाचा फायदा होणार आहे.