वाहतूक नियंत्रणासाठी ४१ नवीन पदे मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 01:12 AM2019-11-25T01:12:07+5:302019-11-25T01:12:25+5:30
राज्यातील विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक शाखेला अतिरिक्त पदे निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानुसार नाशिक पोलीस आयुक्तालयाला ४१ नवीन पदे उपलब्ध होणार आहेत.
नाशिक : राज्यातील विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक शाखेला अतिरिक्त पदे निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानुसार नाशिक पोलीस आयुक्तालयाला ४१ नवीन पदे उपलब्ध होणार आहेत.
वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेली वाहतूक समस्या यामुळे वाहतूक व्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेवर दिलेल्या निकालानुसार गृह विभागाने पोलीस दलातील वाहतूक शाखेसाठी २१४४ पदांची निर्मिती केली असून, त्यानुसार नाशिक पोलीस आयुक्तालयाला ४१ तर ग्रामीण पोलिसांना ३४ पदे मिळणार आहेत. यासंदर्भाचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने तसेच अनधिकृतपणे उभी केलेली वाहने ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मोठ्या शहरांमध्ये अशा वाहनांमुळे निर्माण होणारा अडथळा विचारात घेता यातून मार्ग काढण्यासंदर्भात जनहित याचिका दाखल झाली होती.
या याचिकेनुसार अतिरिक्त पोलीस बळ देण्यासंदर्भातील आदेश गृह विभागाला देण्यात आले होते. त्यानुसार राज्यासाठी पोलीस अधीक्षक - ३, पोलीस उपअधीक्षक- ६, पोलीस निरीक्षक- २७, सहायक पोलीस निरीक्षक- ६३, पोलीस उपनिरीक्षक- १०८, सहायक पोलीस उपनिरीक्षक- २६, पोलीस हवालदार- ३७९, पोलीस शिपाई- ११४३, चालक- २८९ अशी २१४४ पदे निर्माण करण्यास गृहविभागाने मान्यता दिली आहे.
आदेश जारी : गृह विभागाकडून मंजुरी
नाशिक पोलीस आयुक्तालयासाठी १ पोलीस निरीक्षक, २ सहायक पोलीस निरीक्षक, ३ पोलीस उपनिरीक्षक, २ सहायक पोलीस उपनिरीक्षक, ६ हवालदार, १७ पोलीस शिपाई, १० पोलीस शिपाईचालक असे एकूण ४१ पदे नव्याने मिळणार आहे.
नाशिक जिल्हा पोलिसांनादेखील ३४ अतिरिक्त पदे मिळणार आहे. त्यामुळे शहर-ग्रामीण परिसरातील वाहतूक नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे.