बदल्या होतीलच त्यात बदला नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:11 AM2021-07-23T04:11:17+5:302021-07-23T04:11:17+5:30
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या सुखासुखी कधीच पार पडल्या नाहीत. अशा बदल्यांबाबत नेहमीच तक्रारी झाल्या आहेत आणि साहजिकच दोष प्रशासनावर ...
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या सुखासुखी कधीच पार पडल्या नाहीत. अशा बदल्यांबाबत नेहमीच तक्रारी झाल्या आहेत आणि साहजिकच दोष प्रशासनावर फोडण्यात आला आहे. दरवर्षी हा प्रकार घडत असला तरी, प्रशासनाने आपल्या कार्यपद्धतीत बदल केल्याचे ऐकिवात नाही. प्रशासकीय बदल्यांमध्ये खातेप्रमुखांकडून आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्या न करण्याकडे अधिक कल असतो, तर विनंती बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप टाळता येत नाही. यंदादेखील असेच होणार याविषयी शंकाच नाही. परंतु असे असले तरी, यंदाच्या बदल्या पारदर्शीपणे व निष्पक्ष पार पडतील, अशी ग्वाही दिली जात असल्यामुळे सामान्य कर्मचाऱ्यालाही यात न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नसावी. परंतु बदलीपात्र असूनही बदलीच्या ठिकाणी हजर न होणे, सोयीसाठी प्रतिनियुक्तीवर नेमणूक करून घेणे, बदली झालीच तर अन्याय झाल्याची भावना ठायी ठायी ठासून भरून घेत त्याचा राग शासकीय कामकाजावर काढणे असे प्रकार होणारच नाहीत याची ग्वाही कर्मचारी व त्यांच्या संघटना देतील काय? त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना त्यात सर्वांना समान न्यायतत्त्वावर नेमणुका दिल्या जाव्यात, बदलीआड कोणाचा बदला घेतला जाऊ नये इतकेच.
- श्याम बागुल