थकीत देणीप्रकरणी बैठक होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:47 AM2019-11-19T00:47:01+5:302019-11-19T00:47:42+5:30
क्रॉम्प्टन ग्रिव्हज कंपनीकडे ११० लघुउद्योजकांचे पैसे अडकल्याने हे उद्योजक आर्थिक अडचणीत आले आहेत, तर जवळपास ३ हजार कामगारांचे रोजगार धोक्यात आल्याची तक्रार आल्यानंतर लवकरच उद्योजक, कंपनी व्यवस्थापनाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात येणार असल्याची जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ग्वाही दिली.
सातपूर : क्रॉम्प्टन ग्रिव्हज कंपनीकडे ११० लघुउद्योजकांचे पैसे अडकल्याने हे उद्योजक आर्थिक अडचणीत आले आहेत, तर जवळपास ३ हजार कामगारांचे रोजगार धोक्यात आल्याची तक्रार आल्यानंतर लवकरच उद्योजक, कंपनी व्यवस्थापनाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात येणार असल्याची जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ग्वाही दिली.
निमा कार्यालयात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योगमित्रची सभा घेण्यात आली. या सभेत दिंडोरी येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील भूखंडाचा दर कमी करावा, अंबड येथील मोकळ्या भूखंडांना तारेचे कुंपण करणे, सातपूर, अंबड भागात सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था करणे, रस्त्यांची डागडुजी करणे, पथदीप दुरुस्त करणे, औद्योगिक वसाहतीत स्वच्छतागृहे व बसथांबे उभारणे, माळेगाव वसाहतीत प्रथमोपचार केंद्र सुरू करणे व घंटागाडीची सुविधा मिळणे, ईएसआय रुग्णालयाकडून प्रलंबित देयके मिळावीत, औद्योगिक प्रदर्शनासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत भुयारी गटार योजना राबविणे, डिफेन्स इनोव्हेशन हबसाठी दिंडोरी येथे जागा उपलब्ध करून देणे, अंबड येथील शांतीनगर व रमाबाई आंबेडकरनगर झोपडपट्टी स्थलांतरित करणे आदींसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या समस्या सोडविण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिलेत. राज्यातील एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयांपैकी नाशिकचे कार्यालय सर्वोेत्कृष्ट ठरले आहे. तसेच या कार्यालयाने वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी संमत करण्यात आला.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे आदी उपस्थित होते. यावेळी निमाचे उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन, धनंजय बेळे, अभय कुलकर्णी, प्रदीप पेशकार, सुधाकर देशमुख, निखिल पांचाळ, संजय सोनवणे, उदय रकिबे आदींनी चर्चेत भाग घेतला. यावेळी कैलास आहेर, ललित बूब, नितीन ठाकरे, राजेंद्र कोठावदे, बाळासाहेव गुंजाळ, मिलिंद राजपूत, नितीन वागस्कर, दिलीप वाघ, नीलिमा पाटील, योगिता आहेर आदींसह उद्योजक व शासकीय, निमशासकीय विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सूरज मांढरे : उद्योगक्षेत्राची प्रतिमा मलिन करू नये
निमाचे माजी अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी एमआयडीसी कार्यालयावर आरोप केले, त्यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी असे बिनबुडाचे आणि कोणताही पुरावा नसताना आरोप करून उद्योगक्षेत्राची प्रतिमा मलिन करू नये. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राचे वातावरण कोणीही नकारात्मक करण्याचा प्रयत्न करू नका, असे निर्देश दिले. तसेच दर तीन महिन्यांनी ही सभा होत असल्याने खूप विषय प्रलंबित राहतात, याबाबत दर महिन्याला यातील विषयांवर वेळच्या वेळी निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे यांना दिले.