'अशा कितीही धमक्या आल्या तरी मागे हटणार नाही'; छगन भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका
By संजय पाठक | Published: February 10, 2024 10:59 AM2024-02-10T10:59:06+5:302024-02-10T10:59:49+5:30
आज सकाळी माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी या संदर्भात माहिती दिली की, आपल्याला धमकीचे पत्र आणि मेसेज यापूर्वी अनेकदा आलेले आहेत.
नाशिक- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना अज्ञात व्यक्तींनी पत्र पाठवून त्यांना जीवे कट रचण्यात असल्याची माहिती दिली आहे. 50 लाख रुपयांची सुपारी पाच व्यक्तींनी घेतली असल्याची माहिती या पत्राद्वारे देण्यात आली आहे. आपण आपल्या विचार आणि भूमिकेशी ठाम असून असे किती धमकी पत्र आले तरी मागे हटणार नाही अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी या संदर्भात माहिती दिली की, आपल्याला धमकीचे पत्र आणि मेसेज यापूर्वी अनेकदा आलेले आहेत. मात्र काल झालेल्या पत्रात अनेक प्रकारचा तपशील देण्यात आला आहे. सदरचे पत्र हे पोलिसांना देण्यात आले असून ते संबंधित व्यक्तींचा शोध घेतील आणि योग्य ती कारवाई करतील असे भुजबळ म्हणाले. आपण एका विचाराने काम करत असून त्यानुसार यापुढेही काम करू अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरणार नाही असं भुजबळ यांनी सांगितलं.
भुजबळ यांना पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये सागर हॉटेल समोर एक बैठक घेण्यात आली त्यात भुजबळ यांना मारण्यासाठी ५० लाख रुपयांची सुपारी घेण्यात आली आहे. एकूण ५ जणांनी ही सुपारी घेतली असून ते सर्वजण भुजबळ यांचा शोध घेत आहेत त्यामुळे सावध राहा असे नमूद करण्यात आले आहे. काल हे पत्र प्राप्त झाल्यानंतर नाशिकच्या अंबड पोलिसांनी दोन अधिकारी आणि २० कर्मचारी असा बंदोबस्त नाशिकच्या भुजबळ फार्म जवळ वाढवला आहे.