विकासाच्या मुद्द्यावर दोघा पॅनलमध्ये होणार काट्याची लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 09:00 PM2021-01-01T21:00:42+5:302021-01-02T00:13:43+5:30
मालेगाव : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या व तालुक्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या निमगाव ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मधुकर हिरे व जिल्हा परिषद सदस्य जे.डी. हिरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक अहिरे, ॲड.मंगेश हिरे यांच्या समर्थकांमध्ये सरळ लढत होणार आहे. या ग्रामपंचायतीवर मधुकर हिरे यांनी ३५ वर्षे वर्चस्व ठेवले होते. मात्र, त्यांच्या सत्तेला पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक अहिरे यांनी गेल्या १० वर्षांपासून सुरुंग लावला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये यंदा चुरशी लढत होण्याची चिन्हे दिसत आहे.
गेल्या पाच वर्षांत सरपंचपदासाठी तोडफोडीचे व न्यायालयीन तंटेबखेडे पार पडले. यात प्रारंभी माजी सभापती दिपक अहिरे व ॲड.मंगेश हिरे यांच्या गटाच्या सरपंच मिराबाई अहिरे यांनी ३ वर्षे कामकाज पाहिले. यानंतर, मधुकर हिरे गटाच्या निंबा हिरे यांची सरपंचपदी वर्णी लागली. त्यांना केवळ १ वर्षच कामकाज करता आले. सरपंच पदासाठी पुन्हा राजकारण होऊन बळीराम अहिरे यांची सरपंचपदी निवड झाली. या घडामोडीत मोठे राजकारण झाले. अहिरे, हिरे गटाला जावून मिळाले. या ५ वर्षांच्या राजकारणात गावातील विकास कामांकडे दुर्लक्ष झाले. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत अपात्रतेच्या टांगत्या तलवारीमुळे विकास कामांना खीळ बसली आहे. या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग १, २, ३ व ४ मध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. निमगाव माजी मंत्री कै.भाऊसाहेब हिरे, कै.बळीराम हिरे, माजी आमदार कै. शिवरामदादा हिरे, माजी मंत्री प्रशांत हिरे, काँग्रेसचे नेते प्रसाद हिरे यांचे मुळ गाव असून, जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या नेत्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. या ग्रामपंचायतीची सत्ता टिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होत असते. निमगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.