औष्णिक विद्युत केंद्र ‘व्हेंटिलेटर’वर !
By Admin | Published: April 19, 2017 01:56 AM2017-04-19T01:56:48+5:302017-04-19T01:57:36+5:30
एकलहरा येथे दोनच युनिट कार्यरत : शिवसेना राबविणार अभियान
नाशिक : गेल्या साडेचार दशकापासून नाशिकची ओळख बनून राहिलेल्या एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राचे पाचपैकी फक्त दोनच युनिट कार्यरत असून, तेसुद्धा कधीही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. व्हेंटिलेटरवर असलेल्या एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राचे प्राण कंठाशी आले असताना सरकारकडून मात्र नव्याने मंजूर केलेला ६६० मेगावॅटचा वीजप्रकल्प उभारण्यास टाळाटाळ केली जात आहे. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रच नाशिकच्या नकाशावरून पुसून टाकण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला असून, त्यासाठी नाशिककरांमध्ये जागृती करण्यासाठी विद्युत केंद्र बचाव अभियान राबविले जाणार असल्याचे सेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बोरस्ते यांनी सांगितले, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रातील १४० मेगावॅटचे दोन युनिट जून २०११ मध्येच बंद करण्यात आले आहेत. एकलहरे याठिकाणी राज्य सरकारकडून नव्याने ६६० मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यात येणार होता. परंतु, राज्य सरकारने परळी येथे २५० मेगावॅटचे ३, पारस येथे २५० मेगावॅटचे २, भुसावळ येथे ५०० मेगावॅटचे २, कोराडी येथे ६६० मेगावॅटचे ३, चंद्रपूर येथे २७०, ५०० आणि ६६० मेगावॅटचे ३ आणि खापरखेडा येथे ६६० मेगावॅटचा १ याप्रमाणे नवीन प्रकल्प मंजूर करताना नाशिकला मात्र वगळले आहे. एकलहरे येथील एकेक युनिट बंद पडत असताना नवीन युनिट आणण्याबाबत मात्र टाळाटाळ केली जात आहे.
मुळात एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राची सुमारे ४७४ हेक्टर जागा आहे. मुबलक पाणी आहे शिवाय जवळच कोळसा वाहतुकीसाठी समुद्रकिनाराही आहे. सर्व गोष्टी अनुकूल असताना एकलहरे याठिकाणी नवीन युनिट करण्यास विलंब लावला जात आहे. एकलहरे येथील केंद्राच्या चिमणीची उंची २८० मीटरची असल्याचे सांगत संरक्षण खात्याच्या हरकतीचा मुद्दा पुढे केला जात आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांत गांधीनगर विमानतळावरून विमानांची उड्डाणे झालेली नाहीत. एकलहरे येथील केंद्र बंद पडल्यास खासगी वीज कंपनींवर अवलंबून राहावे लागणार आहे.
शिवाय, त्यावर अवलंबून असलेले सुमारे १० हजार कुटुंबे उद्ध्वस्त होतील. रोजगारावर गंडांतर येईल. याशिवाय, राखेमुळे जमीन नापीक झाल्याने तिचाही पुनर्वापर होणार नाही. सद्यस्थितीत केंद्रातील युनिट ४ आणि ५ सुद्धा अखेरची घटका मोजत आहे. त्यांचे आयुष्य संपलेले आहे. त्यामुळे शासनाने केंद्र बंद पडण्याच्या आत नवीन ६६० मेगावॅटचा प्रकल्प नाशकात आणावा, अशी मागणीही बोरस्ते यांनी केली आहे. (प्रतिनिधी)