खंडणी उकळणारे ते ‘तिघे’ फरारच
By admin | Published: December 24, 2014 12:03 AM2014-12-24T00:03:52+5:302014-12-24T00:04:03+5:30
खंडणी उकळणारे ते ‘तिघे’ फरारच
नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवर दवाखाना असलेल्या डॉक्टरांना तुमच्याकडे पालिकेची परवानगी नाही तसेच बोगस डॉक्टर असल्याची बातमी दाखवून बदनामी करण्याची धमकी देऊन पन्नास हजारांची खंडणी मागणारे आरोग्य विभागाचे तोतया कर्मचारी संशयित महेश वाघ, रवि कावते, आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनलचा तोतया पत्रकार महेश घनदाट या तिघांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, हे तिघेही फरार असून, पोलीस त्यांचा शोघ घेत आहेत़
साई क्लिनिकचे डॉ़ अमोल वाजे यांच्याकडे सोमवारी दुपारी संशयित भारत घनदाट हा महेश वाघला घेऊन तपासणीसाठी आला़ यानंतर लिहून दिलेली औषधे घेण्यासाठी बाहेर पडलेले हे दोघे थोड्याच वेळात रवि कावते यास व्हिडीओ कॅमेऱ्यासह घेऊन दवाखान्यात आले़ यातील दोघांनी महापालिकेच्या आरोग्य विभागातून आल्याचे तर भारत घनदाट याने आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनलचा पत्रकार असल्याचे सांगितले़ यानंतर दोघांनी वाजे यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी करून ते तपासून पाहत तुम्ही बोगस डॉक्टर आहात, असे सांगितले़
तुमच्याकडे महापालिकेचा परवानगी नाही असे सांगत महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़ गायकवाड यांना फोनही लावून त्यांच्याशी बोलणेही करून दिले़ यातील महेश वाघ व भारत घनदाट याने पत्रकार असल्याचे सांगून बदनामी टाळण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली़ डॉ़ वाजे यांनी नगरसेवक सचिन भोर व तानाजी जायभावे यांना फोन केल्यांनतर या तिघांचाही खोटारडेपणा उघड झाला़ त्यांना ताब्यात घेतले असता डॉक्टर गायकवाड यांच्या सांगण्यानुसार काम करीत असून, पाटीलनगर येथील डॉ़ज्योती पवार, राणेनगर येथील डॉ़उषा शिरुडे, सिंहस्थनगर येथील डॉ़विजय काकडे, डॉ़ दीपाली देशमुख यांच्याकडून पैसे घेऊन त्यातील काही रक्कम कमिशन म्हणून दिल्याचे सांगितले़
याबाबत मनपा आयुक्तांनी कायदेशीर कारवाई करण्याबाबत सांगितले असता भारत घनदाट व रवि कावते हे दोघे फरार झाले़ दरम्यान, या प्रकरणी संशयित भारत घनदाट, रवि कावत व महेश वाघ या तिघांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़ (प्रतिनिधी)